पिंपरी-चिंचवड : सीबीआय, अर्थ मंत्रालयाचा हवाला देत १५ लाख उडवले
सीबीआय अधिकारी आणि अर्थ मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीच्या नावावर १५ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. त्यातील १५ लाख रुपये काढून घेत व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना १८ जून रोजी महाळुंगे येथे घडली. या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक मोबाईल क्रमांकधारक आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीस फोन करून मी 'फेड एक्स कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. तुमचे पार्सल इराण देशात जाणार होते. तुमच्या पार्सलमध्ये आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्याने ते कस्टमच्या ताब्यात आहे. आम्ही तुमच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. त्यात तुमचा सहभाग नसल्यास तुम्ही पोलीस क्लियरन्स सर्टिफिकेट घ्या', असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी इतर साथीदारांना फोन कनेक्ट केला. इतर आरोपींनी ते सीबीआय अधिकारी आणि अर्थ मंत्रालयातील अधिकारी असल्याचे सांगितले. फिर्यादीस स्काईप ॲप घेण्यास सांगितले. त्यावर व्हीडीओ कॉल करून फिर्यादीचे आधार कार्ड, बँक स्टेटमेंट घेऊन फिर्यादीस मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नावाचे एसबीआय बँकेचे पेयी रजिस्टर करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या नावाने कर्ज मंजूर केले. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करण्याची भीती दाखवून त्यांच्या नावावर १५ लाख ९० हजार रुपये कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील १५ लाख रुपये मा स्टील फर्निचर इंडस्ट्री या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेत फिर्यादीची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.