गोळीबाराच्या तपासासाठी मुंबईच्या बॅलेस्टिक एक्सपर्टची मदत
पुणे : चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ऍलोमा काऊंटी या आलिशान सोसायटीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी मुंबईच्या बॅलेस्टिक एक्सपर्टची मदत घेतली आहे. घटनास्थळावर आढळून आलेली गोळी तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ही गोळी नेमक्या कोणत्या शस्त्रामधून झाडण्यात आली याची माहिती समजणार आहे. त्यामुळे आता या गुन्ह्याच्या तपासात बॅलेस्टिक अहवालाची वाट पहावी लागणार आहे.
मूळचे कोरियन नागरीक असलेल्या जिऑग ग्यु काँग (वय ३६, रा. आलोमाम काऊंटी, नागरस रोड, बाणेर) यांच्या घराच्या बेडरूमच्या स्लायडिंग डोअरवर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली होती. ही घटना मंगळवारी साधारण सहा वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली होती. गोळीबार झाला तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगी घरामध्येच होते. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. काँग हे दास कंपनी या बड्या कंपनीमध्ये नोकरी करतात. ते या कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गोळी नेमकी कोणत्या दिशेने झाडण्यात आली असावी यांचा अंदाज घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सिविक मिररला सांगितले, की पुण्यामध्ये बॅलेस्टिक एक्सपर्टची नाही. त्यामुळे घटनास्थळी आढळून आलेल्या गोळीचा भाग तपासणीसाठी मुंबईला बॅलेस्टिक एक्सपर्टकडे पाठविण्यात आला आहे. तपासात गोळी नेमकी कोणत्या शस्त्रामधून झाडण्यात आली हे समजू शकलेले नाही. त्यामुळे बॅलेस्टिक एक्सपर्टचा अहवाल महत्वाचा आहे. त्यामध्ये नेमकेपणाने शस्त्राबाबत माहिती मिळू शकेल. त्यानंतर या तपासाला दिशा मिळू शकेल.' पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.