पुण्यात सशस्त्र दरोडा; शस्त्राचा धाक दाखवत साडे सोळा लाखांचा ऐवज केला लंपास

पुणे : हवेली तालुक्यातील नायगाव या ठिकाणी असलेल्या बीवरी गावामध्ये एका कुटुंबाच्या घरावर सात सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : हवेली तालुक्यातील नायगाव (Naygaon) या ठिकाणी असलेल्या बीवरी गावामध्ये एका कुटुंबाच्या घरावर सात सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री पावणे दोन ते दोन वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा घालण्यात आला. दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत तसेच मारहाण करून घरातील सोळा लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी प्रशांत विलास गोते (Prashant Vilas Gote) (वय ४०, रा. मु. बिवरी, पो. नायगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात सात अज्ञात आरोपी विरोधात भादवि ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोते आणि त्यांचे कुटुंबीय रात्री जेवण करून घरामध्ये झोपलेले होते. मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सात अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराजवळ आल्या. त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा कटावणीने उघडला. हत्यारांसह घरामध्ये प्रवेश केला.

या सर्व आवाजामुळे घरातील लोक जागे झाले. या सर्वांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील बेडरूममधील कपाटात असलेली पाच लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यासोबतच फिर्यादी गोते यांची पत्नी, आई, बहीण यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांचा गळा कापण्याची धमकी दिली. गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, ओढून काढले. त्यांच्या बहिणीला मारहाण करण्यात आली. आईला तोंडावर जबर मारहाण करून कानाला आणि तोंडाला दुखापत करण्यात आली. (Pune Robbbery News)

चोरट्याने अशाप्रकारे एकूण १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड दरोडा घालून चोरून नेली. पळून जात असताना चोरट्यांनी पोलिसांना फोन करू नये म्हणून फिर्यादी यांच्या घरातील सर्वांचे फोन घेऊन ते फोडून टाकले. त्यानंतर, आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिमंडल चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, वरिस्थ पोलीस निरीक्षक कैलास करे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करीत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest