संग्रहित छायाचित्र
पुणे : 'टीईटी' घोटाळ्यातील मुख्य आरोपी तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम नामदेव सुपे याच्यावर बेकायदेशीर पद्धतीने आणि भ्रष्ट मार्गाने अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खोदकाम सुरू केले आहे. एसीबीने त्याच्या घराची झडती घेतली. या घर झडतीमध्ये त्याच्याकडे नव्याने ३ कोटी ९५ लाख ३५ हजार ७९५ रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती उघड झाली आहे. त्याने आपल्या पत्नी, मुले आणि नातेवाईकांच्या नावाने पुणे, ठाणे, नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जमिनी व सदनिका खरेदी केल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले आहे. एसीबीने यापूर्वी त्याच्याकडून २ कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपयांची रोकड, १४५ तोळे सोने असा ३ कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांची मालमत्ता जप्त केलेली होती. आतापर्यंत त्याच्याकडून ७ कोटी ५५ लाख ३५ हजार ३८५ रुपयांची मालमत्ता उघडकीस आणण्यात आली आहे.
सांगवी पोलीस ठाण्यामध्ये तुकाराम नामदेव सुपे (वय ५९, रा.कल्पतरू, गांगर्डे नगर,सुदर्शन हॉस्पिटल समोर, पिंपळे गुरव) विरुद्ध एसीबीने नुकताच गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारणा कायदा २०१८ च्या कलम १३ (१) (ब) १३ (२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीराम विष्णू शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुपे याच्या पिंपळे गुरव येथील कल्पतरू या बंगल्याची झडती घेण्यात आली त्यामध्ये त्याच्याकडील कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला. त्याच्याकडे एल ३२ बोअरचे रिव्हॉल्वर देखील मिळाले आहे. ते देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सुपे याच्या नावाने असलेली कल्पतरू नावाची चार मजली इमारत (१ कोटी ७१ लाख), पिंपरी चिंचवड येथील वडमुख वाडी मध्ये असलेली एक सदनिका (२० लाख), पिंपळे गुरव या ठिकाणी श्री दत्तकृपा नावाची तीन मजली इमारत (१ लाख २५ हजार), यासोबतच त्याच्या आणि पत्नीच्या नावाने तसेच मुलगा आणि मुलीच्या नावाने संत तुकाराम नगर, भोसरी या ठिकाणी तळमजल्यासह चार मजली इमारत (६५ लाख), त्याच्या स्वतःच्या नावाने वडाळा शिवार, नाशिक या ठिकाणी एक सदनिका (१५ लाख), पत्नी कल्पना यांच्या नावाने ठाणे येथील अल्पेश अपार्टमेंटमध्ये असलेली एक सदनिका (२५ लाख) निष्पन्न झाली आहे.
तसेच पत्नी कल्पना हिच्या नावाने ठाणे येथील मुरबाडमधील पाटगावध्ये जमीन (३ लाख ४२ हजार रुपये) घेण्यात आली आहे. तसेच कल्पना आणि सोपान शंकर येंदे यांच्या नावाने जुन्नर मधील कोळवाडी येथे एक जमीन (४ लाख ५० हजार) घेण्यात आलेली आहे. यासोबतच, जुन्नरमधील माळवाडीमधील दोन जमिनी (६ लाख २० हजार रुपये) आणि आंबेगाव तालुक्यामधील फलोदे या ठिकाणी जमिन (९ लाख ५० हजार) एवढी मालमत्ता समोर आली आहे. तसेच, त्याच्याकडे सात लाखांची एक कार, साडेपाच लाख रुपयांचा ट्रॅक्टर, दोन दुचाकी असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास, संपत्ती आणि मालमत्तेबाबतचा शोध एसीबी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.