संग्रहित छायाचित्र
नागपूर : पार्टी करून घरी परतताना दोन मद्यधुंद महिलांनी दोन मोपेडस्वार युवकांना कारने चिरडल्याची घटना रामझुल्यावर घडली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून यात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तहसील पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले आहे. (Nagpur Accident News)
मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. जाफरनगर) अशी मृतांची नावे आहेत. माधुरी (वय ३७), रितीका (वय ३९) अशी धडक देणाऱ्या दोन महिलांची नावे आहेत. रितीका कार चालवित होत्या तर बाजूला माधुरी बसल्या होत्या. कार चालवताना दोघीही मद्यधुंद अवस्थेत होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास रामझुल्यावरून मोहम्मद हुसैन हा त्याचा मित्र मोहम्मद आतीफसह मोपेडवरून मेयो हॉस्पिटलकडे येत होता. डाव्या बाजूने जात असताना त्यांना भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. मद्यधुंद असलेल्या रितीका या मर्सिडिझ (एम.एच.४९, ए.एस. ६१११) चालवत होत्या. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर मागून त्यांचे पती दिनेश तेथे आले. दोन्ही महिला आपले वाहन सोडून दिनेश यांच्या वाहनात बसून पसार झाल्या. अपघातानंतर नागरिकांचा जमाव रामझुल्यावर गोळा झाला. त्यांनी जखमी युवकांना मेयो रुग्णालयात नेले असता मोहम्मद हुसैन याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याशिवाय मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया याच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी कार जप्त केली. न्यायालयाने आरोपी महिलांना जामीन मंजूर केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.