संग्रहित छायाचित्र
पुणे : हजारो कोटी रुपयांचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. पुणे सातारा रस्त्यावर असलेल्या सिटीप्राईड सिनेमागृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. समृद्धी जीवन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या महेश मोतेवारचा हा आरोपी जवळचा साथीदार असून तो सात वर्षापासुन फरार होता.
समृद्ध जीवनचा सर्वेसर्वा महेश मोतेवार विरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात २०१६ साली भादवि कलम ४०३, ४०६, ४०९, १२० (ब), ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गल्ली नं. ३, गोकुळनगर, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मोतेवार आणि हिंगे यांनी संगनमत करून महाराष्ट्र व संपुर्ण देशभरात समृध्द जीवन फुड्स इंडिया लिमीटेड व समृध्द जीवन मल्टी स्टेट मल्टी पर्पज को. ऑप सोसायटी यांच्या अनेक शाखा उघडल्या. त्यांच्या माध्यमातुन गुंतवणूकदारांची ४ हजार ७२५ कोटीहून अधिक रकमेचा अपहार केला होता.
आरोपी हिंगे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता. तो मागील सात वर्षापासुन पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवुन राहत असल्याने पोलिसांना मिळुन येत नव्हता. तो ६ डिसेंबर रोजी सिटीप्राईड सिनेमागृह, सातारा रोड याठिकाणी येणार असलेबाबत गोपनिय बातमीदारामार्फत सीआयडीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचुन, आरोपीचा मागोवा घेत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
समृध्द जीवन समूहाविरूध्द भारतभरात एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. समृध्द जीवन समूहाद्वारे संपूर्ण भारतभरातील ६४ लाखांपेक्षा अधीक गुंतवणूकदारांची व महाराष्ट्रातील एकूण १८ लाख गुंतवणूकदारांची फसवणुक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील एकूण २५ आरोपींपैकी १६ आरोपीतांस अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सदर कामगिरी अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपूरे, पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार सुनिल बनसोडे, प्रदिप चव्हाण, कोळी यांनी केली.