संग्रहित छायाचित्र
चार वाहनांमध्ये चक्क ९५ जनावरे कोंबून त्यांची वाहतूक केल्याचा प्रकार शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याबाबत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २६) पहाटे उर्से टोल नाक्याजवळ उघडकीस आली.
हैदर बिलाल शेख (वय ३१, रा. चेंबूर, मुंबई), रफिक महम्मद कुरेशी (वय २१, रा. कुर्ला, मुंबई), इमरान अहमद कुरेशी (वय ३२, रा. कुर्ला, मुंबई), अरबाज अब्दुल कुरेशी (वय २०, रा. कुर्ला, मुंबई), काशिम नाशिर (वय ३८, रा. बुलंदशहर, गाझियाबाद), मोहम्मद बसीम कुरेशी (रा. बुलंदशहर, गाझियाबाद), दिपक सोनाजी बावस्कर (वय ४७, रा. गोवंडी, मुंबई), खलील कासीम कुरेशी (रा. कुर्ला ईस्ट मुंबई), रफिक बेपारी, हुसैन बेपारी (दोघे रा. कल्याण, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार शुभम राजगुरे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चार वाहनांमध्ये चारापाण्याची सोय न करता ९५ म्हशी आणि रेडके कोंबली. जनावरांची वाहतूक करण्याबाबत आरोपींकडे कोणताही परवाना नव्हता. वाहतूक करताना जनावरांना दुखापत झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठी साहित्य औषधे देखील वाहनांमध्ये नव्हती. हा प्रकार उर्से टोल नाक्यावर उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दहा जणांवर गुन्हा दाखल केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.