नफ्याच्या आमिषाने तब्बल १ कोटी ६ लाखांची फसवणूक
लक्ष्मण मोरे
बांधकाम व्यवसायाकरिता मित्राला भूलथापा (Pune Crime News) देऊन त्याच्याकडून एक कोटी सहा लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. ही फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police) फसवणुकीचा (fruad) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे परत मागितल्यानंतर या व्यक्तीला आपली अंडरवर्ल्डमध्ये ओळख असल्याचे सांगत पैसे मागितले तर, अंडरवर्ल्डला सुपारी देऊन जिवे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली. थेट अंडरवर्ल्डची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. लष्कर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
अब्दुल हुसेन नईमाबादी (रा. नवधुन बंगलो, कॅम्प), शोएब मैनुद्दीन अत्तार (रा. जामा मशीद जवळ, बोपोडी), इमरान लतीफ खान (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मुख्तार हुसेन मोहम्मद (वय ४४, रा. सोपान बाग, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार सप्टेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधी दरम्यान बँक ऑफ इंडियाच्या लष्कर परिसरातील शाखेमध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुख्तार मोहम्मद हे आरोपी अब्दुल हसन नईमाबादी याचे मित्र आहेत. अब्दुल यांनी शोएब आणि इमरान यांच्याशी संगनमत करून मुख्तार यांना फसवले. या सर्वांचा बांधकाम व्यवसाय आहे. कोंढव्यामध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मुख्तार यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली. आपल्याला या प्रोजेक्टसाठी दहा कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगत 'आतापर्यंत चार कोटी रुपये जमवले आहेत. तू थोडी मदत कर. त्या बदल्यात ७० लाख रुपये जास्त देतो' असे त्यांनी सांगितले.
त्यांच्यावर विश्वास ठेवून मुख्तार यांनी ९७ लाख रुपये अब्दुल याला दिले. हे पैसे दोन महिन्यात परत करतो, असे त्याने सांगितले होते. आपल्या पैशांसाठी मुख्तार यांनी वारंवार पाठपुरावा केला. परंतु, अब्दुल याने त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, त्यांना भेटून त्यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला. त्यावेळी अब्दुल याने त्यांना ३५ लाख रुपये परत दिले. उर्वरित ६२ लाख रुपये त्याच्याकडे राहिले होते. थोड्या दिवसांनी अब्दुल याने कोंढव्यामध्ये आणखी एका पार्टनर सोबत 'जॉईंट व्हेंचर'मध्ये नवीन प्रोजेक्ट करत असल्याची बतावणी केली. या प्रोजेक्टसाठी लागणारे स्टील खरेदी करायचे आहे, त्यासाठी ४४ लाख रुपये दिल्यास हे पैसे आठ दिवसांत परत करतो आणि आधीचे राहिलेले ६२ लाख, त्यावरचा नफा अशी सर्व रक्कम एकत्रित परत करतो, असा विश्वास त्यांनी दिला. आठ दिवसात दहा कोटी रुपये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मुख्तार यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला आणखी ४४ लाख ५० हजार रुपये दिले. परंतु, यातील कोणतेही पैसे त्यांनी परत केले नाहीत. वर्षभर पैसे परत मिळावेत यासाठी मुख्तार पाठपुरावा करीत होते. परंतु, आरोपींनी त्यांना पैसे दिले नाहीत. तसेच, त्यांचे फोन देखील घेणे बंद केले. शोएब आणि इमरान हे देखील या संगनमतामध्ये सहभागी होते. या दोघांनी 'अब्दुलने केलेल्या आर्थिक व्यवहाराशी आमचा काही संबंध नाही' म्हणत हात वर केले.
दरम्यान या तिघांकडेही पैशाचा तगादा लावल्यामुळे त्यांनी मुख्तार यांना 'तुला कुठे जायचे तिथे जा. आमची अंडरवर्ल्डमध्ये ओळख आहे. पुन्हा आमच्याकडे आला तर अंडरवर्ल्डला सुपारी देऊन तुला जिवे ठार मारू' अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुख्तार यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे करीत आहेत.