संग्रहित छायाचित्र
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्राणांतिक अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात प्रवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाला एसटी बसची धडक बसली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवीण बालाजी कोका (वय २८, रा. हैद्राबाद, तेलंगणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अमर चकराल (वय ४४, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कोका हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात खासगी आस्थापनेत काम करतात. ते कामानिमित्त तिकडेच राहतात. त्यांची आत्या पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहण्यास आहे. दिवाळीनिमित्त ते आत्याला भेटायला आले होते. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सोलापूर-पुणे बसने पुण्यात आले. स्वारगेट एसटी स्थानकात ते बसमधून खाली उतरले. बिबवेवाडीकडे निघालेले असतानाच एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारात एका एसटी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसाट तपास करत आहेत.
वृद्ध महिलेचे दागिने लांबवले
प्रवासासाठी निघालेल्या वृद्ध महिलेच्या पिशवीमधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती येथे राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कामानिमित्त पुण्यात आलेली होती. काम संपवून ती पुन्हा बारामतीला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली. बसमध्ये चढत असतानाच चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून अडीच हजारांची रोकड आणि ६९ हजार रुपयांचे दागिने असा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.