पुणे: ‘पाटबंधारे’ च्या जागेत अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट!

घाटकोपरमधील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती शहरात होऊ नये यासाठी पालिका हद्दीतील नियमबाह्य जाहिरात फलक हटविण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले असले तरी हा केवळ दिखावा आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाने गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या जागेतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी  महानगरपालिकेकडे वारंवार केली आहे.

संग्रहित छायाचित्र

आकाशचिन्ह विभागाचा आशीर्वाद असल्याने सहा वर्षांपूर्वी तक्रार करूनही कारवाई शून्य 

घाटकोपरमधील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती शहरात होऊ नये यासाठी पालिका हद्दीतील नियमबाह्य जाहिरात फलक हटविण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले असले तरी हा केवळ दिखावा आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाने गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या जागेतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी  महानगरपालिकेकडे वारंवार केली आहे. असे असूनही आजतागायत कोणत्याही होर्डिंगवर कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती नव्याने केलेल्या माहिती अधिकारात केलेल्या अर्जाच्या उत्तरात उघड झाली आहे. त्यामुळे पालिकेने पंधरा दिवसांच्या आत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी दिला आहे.

अनंत घरत म्हणतात की, मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये जाहिरातीसाठी मोठ-मोठे होर्डिंग उभारले जातात. एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यावर ते अनधिकृत असल्याचे स्पष्ट होते. कायद्याचे पालन केले नाही म्हणून कारवाई होते. असे असताना ६ वर्षांहून जास्त काळ होऊनही आकाशचिन्ह विभाग कुंभकर्णासारखा झोपल्याचे दिसते. खडकवासला पाटबंधारे विभागाने १८ सप्टेंबर २०१८ ला पुणे मनपा आयुक्तांना पत्र देऊन अनधिकृत होर्डिंगधारकांची नावे पाठवली होती. तसेच त्यांचा परवाना नूतनीकरण करू नये असे कळविले असतानाही आकाशचिन्ह विभागाने आजतागायत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार खडकवासला पाटबंधारे विभागाची कॅनॉल आणि परिसरातील जागा ही महानगरपालिका हद्दीतील खडकवासला ते लोणीकाळभोरपर्यंत आहे. पालिकेची विविध क्षेत्रीय कार्यालये या हद्दीत आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईबाबत माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे साहाय्यक आयुक्त आणि आकाशचिन्ह विभागातील अधिकारी देतात. हा केवळ वेळकाढूपणा असून अनधिकृत होर्डिंगला अभय देण्याचे यांचे धोरण आहे. सद्यस्थितीत पाटबंधारेच्या जागेतील अनधिकृत होर्डिंगसंदर्भात कोर्टातील केसवरील स्थगिती उठली असून कारवाईचा मार्ग मोकळा झाला असतानाही कोणाच्या आदेशाची आणि किंवा निष्पापांच्या मृत्यूची वाट प्रशासन पाहात आहे, असा संतप्त सवाल घरत यांनी केला आहे. (Pune Hoarding News)

पालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जात आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाच्या जागेत उभारण्यात आलेले होर्डिंग अनधिकृत आहेत किंवा कसे याबाबत माहिती घेतली जाईल. २०१८ साली दिलेल्या पत्राबाबत माहिती घेतली जाईल. अनधिकृत होर्डिंग आहेत का, याची खात्री करून पालिकेकडून कारवाई केली जाईल. याबाबत योग्य माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.
 - माधव जगताप, आकाशचिन्ह विभाग प्रमुख

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest