पुणे: अनधिकृत होर्डिंगवर कारवाई कधी? - हडपसर, मुंढवा, औंध भागात सर्वाधिक ८५ होर्डिंग अनधिकृत: महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती

मुंबईत घडलेल्या घटनेत १४ जणांनी जीव गमावला आहे. अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यातील सर्वच शहरात होर्डिंगबाबतचा आढावा घेण्यात येत आहे. पुणे महापालिकेनेदेखील शहरातील होर्डिंगचा आढावा घेतला आहे. शहरात एकूण २,५९८ होर्डिंग अधिकृत असल्याची माहिती आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना मंगळवारी (दि. १४) दिली.

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील होर्डिंगच्या भयंकर दुर्घटनेत १४ जणांचे जीव गेल्यानंतर पुण्यात कारवाईचे आदेश, खरंच कारवाई करणार की नेहमीप्रमाणे अहवालांचा खेळ करणार?

मुंबईत वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात घाटकोपर येथील पेट्रोल पम्पवर १०० फूट उंच होर्डिंग कोसळल्याची दुदैवी घटना सोमवारी (दि. १३) घडली. या घटनेमुळे मुंबईसह राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे शहराला चहूबाजूंनी उंच होर्डिंगने वेढा घातला आहे. शहरात अशी घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात हडपसर, मुंढवा आणि औंध भागात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. मात्र होर्डिंग अनधिकृत असल्याचे माहित असूनदेखील अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुंबईत घडलेल्या घटनेत १४ जणांनी जीव गमावला आहे. अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यातील सर्वच शहरात होर्डिंगबाबतचा आढावा घेण्यात येत आहे. पुणे महापालिकेनेदेखील शहरातील होर्डिंगचा आढावा घेतला आहे. शहरात एकूण २,५९८ होर्डिंग अधिकृत असल्याची माहिती आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना मंगळवारी (दि. १४)  दिली. यापैकी २,५०० होर्डिंगचे  स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. तसेच ज्यांचे  स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे, परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर अशा होर्डिंगचा परवाना रद्द करून होर्डिंगधारकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

गेल्या महिन्यात वादळीवाऱ्यासह वाघोली परिसरात मोठा पाऊस झाला होता. या पावसात नगर रस्त्यावरील वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरातील उबाळेनगर बसथांब्याजवळील रुद्र मोटर्स येथील अधिकृत मोठे होर्डिंग कोसळले होते. या होर्डिंगमुळे एका चार चाकीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या होर्डिंगधारकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. परंतु अधिकृत होर्डिंग असताना तसेच त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले असतानादेखील ते कोसळले कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच शहरातील कोणत्याही होर्डिंगची पाहणी करण्यात आलेली नाही.

पुण्यातदेखील गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सुदैवाने अद्याप कोणतेही होर्डिंग कोसळले नाही. परंतु महापालिकेकडून पाहणी अथवा सर्वेक्षण करणे अपेक्षित असताना ते करण्यात आले नाही. महापालिकेच्या अशा उदासीन कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. मुंबईनंतरच्या घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासन जागे झाले असले तरी अनधिकृत होर्डिंगवर खरंच कारवाई करणार की नेहमीप्रमाणे अहवालांचा खेळ खेळला जाणार, असा प्रश्न पुणेकरांकडून आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सर्वेक्षण करून आयुक्तांनी मागवला दोन दिवसांत अहवाल

पुणे महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत पुणे शहर हद्दीत जाहिरात फलक ( होर्डिंग्ज) उभारण्यास परवानगी देण्यात येते.  मुंबई येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या अनुषंगाने पुणे महापालिका आयुक्तांनी परवाना व आकाशचिन्ह विभागाचा आढावा घेऊन सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व अधिकृत जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्टनुसार त्यांचे ऑडिट करणे व ज्या जाहिरात फलकांमध्ये त्रुटी असतील त्यावर कारवाई करणे, अवकाळी पाऊस, वारा यामध्ये एकही जाहिरात फलक कोसळणार नाही या अनुषंगाने दक्षता घेणे तसेच महापालिका हद्दीत एकही अनधिकृत जाहिरात फलक शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घेणे आणि अनधिकृत जाहिरात फलक आढळून आल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उपआयुक्त परिमंडळ यांची राहील. याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आदेशाप्रमाणे याबाबतचे सर्वेक्षण केले जाणार असून अहवाल  दोन दिवसांत देण्याच्या सूचना आम्हाला आयुक्तांनी दिल्या आहेत, अशी माहिती परवाना व आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

शहरात एकूण २,५९८ अधिकृत होर्डिंग आहेत. हडपसर, मुंढवा आणि औंध भागात ८५ होर्डिंग अनधिकृत आहेत. अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचे आदेश दिले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे, अशा होर्डिंगची पाहणी केली जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार शहरात एकही होर्डिंग धोकादायक नाही. ऑडिटमध्ये काही त्रुटी अढळून आल्यास होर्डिंगचा परवाना रद्द केला जाईल. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून महापालिकेचा कर वसूल केला जाईल.
- डॉ. राजेंद्र भोसले,आयुक्त, पुणे महापालिका

आयुक्त म्हणाले..

- पुणे शहरात एकूण १,५६४ अनधिकृत होर्डिंगवर पुणे महापालिकेने केली कारवाई

- शहरातील सगळ्या होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आयुक्तांचे आदेश

- शहरात एकूण २,५९८ अधिकृत होर्डिंग

- अनधिकृत असेल तर परवाना रद्द करण्याचे आदेश

- अनधिकृत असेल तर  गुन्हा दाखल करणार

- २,३०० होर्डिंगचे ऑडिट पूर्ण

टिळक चौकातील होर्डिंगचा परवाना रद्द करण्याची आली होती वेळ
महापालिकेची दिशाभूल करून टिळक चौकातील संभाजी पोलीस चौकीच्या मागे तीन होर्डिंग उभारण्यात आले होते. महापालिकेच्या जागेवर आणि नदीपात्रात हे होर्डिंग आले होते. हे होर्डिंग उभारताना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. तसेच त्याची पाहणीदेखील करण्यात आली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभारण्यात आले होते. त्यानंतर कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन निरीक्षकांचे निलंबन करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यानंतरही बेकायदा असलेल्या या होर्डिंगला कायदेशीर मान्यता घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र त्यावर टीका झाल्याने महापालिकेने कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कारवाई थांबविण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे होर्डिंगला अभयच देण्यात आले होते. भाजपच्या बड्या नेत्याच्या दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याची चर्चा याप्रकरणी रंगली होती. मात्र प्रसारमाध्यमांचा दबाव आणि पुणेकरांनी व्यक्त केलेल्या संतापावरून महापालिका आयुक्तांनी हे होर्डिंग पाडण्याचा निर्णय घेतला होता.

जुना बाजार चौकात होर्डिंग पडल्याने चार जणांचा झाला होता मृत्यू
पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. तर आठ जण गंभीर जखमी झाले होते.  या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली होती.  रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्ज काढण्याचं काम केले जाते होते. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर शहरातील होर्डिंगबाबत कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला कधीच मुहुर्त मिळाला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest