संग्रहित छायाचित्र
पुणे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू असून गुरुवारी (दि. २५) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रातही पावसाने ठाण मांडले होते.
पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणसाखळीतून पाणीपुरवठा होतो. खडकवासला १०० टक्के भरले असून पानशेत धरण ६८.१२ टक्के भरले आहे. टेमघर धरणाचा पाणीसाठा ४८.६१ टक्क्यांवर आला आहे. वरसगाव धरण ५३.४० टक्के ठरले आहे.
पुणे शहर, ग्रामीण भागात आणि घाट विभागात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या स्थितीमुळे विस्तीर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले असून त्यामुळे पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. संततधार पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असून या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
खडकवासला जलाशयाच्या आसपासच्या पर्जन्यमानात लक्षणीय बदल दिसून आला आहे. २१ जुलै रोजी खडकवासला येथे फारसा पाऊस झाला नाही, मात्र अवघ्या तीन दिवसांनी २४ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. परिसरातील इतर धरणक्षेत्रातही या कालावधीत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे त्यांच्या साठवण पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्र तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. परिणामी वरसगाव, खडकवासला, पवना या धरणातून पणी सोडण्यात येत आहे. यामुळे पुणे शहर आणि परिसरात जलमय स्थिती झाली. मुळा तसेच मुठा नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या सर्व सोसायटी,वसाहतींमध्ये पणी शिरले. नदीपात्रातील पूल बुडाल्याने तसेच जागोजागी पाणी साठणे, झाड पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
गेले काही दिवस पुण्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेले चार दिवस सूर्य नारायणाचे दर्शन ही दुर्लभ झाले आहे.मंगळवारपासून घाट तसेच शहरी परिसरात पाऊस वाढीस लागला.बुधवारी दिवसभर तसेच गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी दिवसभर पावसाची तीव्रता कायम होती शहर, उपनगर, घाट भाग तसेच ग्रामीण भागात १०० मिमी च्या आसपास पाऊस नोंदविण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर, ग्रामीण भाग आणि घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा बसला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) हवामान अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना शिवाजीनगर परिसरात गुरुवारी पाऊस ११४.१ मिमी पर्यंत पोहोचला, ही एक विशेष अपवादात्मक घटना असल्याचे नमूद केले. तुलनेने बुधवारी ३९.१ मिमी पाऊस पडला, तर मंगळवारी सुमारे १५ मिमी पाऊस झाला. कश्यपी यांच्या मते, ३० जुलै २०१४ रोजी पडलेल्या ८४.३ मिमी पावसानंतरचा हा नजिकच्या काळातील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे.
कश्यपी म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील घाट विभागात अतिवृष्टीच्या अंदाजामुळे नुकताच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांची वाताहात आणि दृश्यमानता कमी होण्याची दाट शक्यता आहे. पुढील काळात रत्नागिरी, मुंबई, पालघर, कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, नंदुरबार आणि नाशिकमधील घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिंगोली, परभणी, जालना, जळगाव, संभाजी नगर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे."
पुण्यात मुसळधार पाऊस पडला आहे. २५ जुलै रोजी ११४.१ मिमी पावसाची नोंद झाली. हा पुणे शहराच्या इतिहासातील उच्चांकी दहावा, तर जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस आहे.
- डॉ. मेधा खोले, हवामान अंदाज विभागप्रमुख, आयएमडी
अग्निशामक दलाचे २०० कर्मचारी तैनात
२४ आणि २५ जुलै या दोन दिवसांत अग्निशामक दलातर्फे २५४ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले तर ७८ ठिकाणी पडलेली झाडे, फांद्या हलवण्यात आल्या.
पुणे परिसरातील धरणांची गुरुवार संध्याकाळपर्यंतची स्थिती (धरण टक्केवारी)
खडकवासला १०० टक्के
टेमघर ४८.६१ टक्के
वरसगाव ५३.४० टक्के
पानशेत ६८.१२ टक्के
मुळशी ५६.३२ टक्के
पवना ५४.१४ टक्के
कासारसाई ७६.६५ टक्के