‘वंदे मातरम्’ निर्मितीचे १५० वे वर्षे सुरू झाल्याचे निमित्त साधून ‘वंदे मातरम् १५०’ या अभिवाचनात्मक दृकश्राव्य विशेष कार्यक्रमाचे शुक्रवारी (दि. ८) भरत नाट्य मंदिरात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पुणेकरांनी हा रोमांचकारी अनुभव घेतला. भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम् सार्ध शती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
या उपक्रमांचा शुभारंभ अभिवाचनाच्या कार्यक्रमाने झाला. जन्मदा प्रतिष्ठान निर्मित, मल्हार प्रॉडक्शन प्रकाशित आणि ग्राहक पेठ आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन वंदे मातरम्चे संशोधक-अभ्यासक मिलिंद सबनीस यांचे तर दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप फाटक, अभिषेक खेडकर आणि अवंती लोहकरे यांनी प्रभावीपणे अभिवाचन केले. दृकश्राव्य माध्यमाचे संगीत अजय पराड यांचे होते तर अपर्णा केळकर, पद्मजा लामरुड, पार्थ उमराणी, देवव्रत भातखंडे यांनी पार्श्वगायन केले आहे. दृश्य संकलन महेश लिमये यांचे आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात देशभूमीला मातृरूपात पाहताना द्रष्टे कवी बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय यांनी जाज्वल्यपूर्ण शब्दांमध्ये रचलेले वंदे मातरम् हे गीत देशवासियांचे हृदय जिंकेल या विश्वासाने जगासमोर आणले. भारत मातेला ब्रिटिशरूपी शत्रूचे मर्दन करणाऱ्या देवी रूपात पाहण्याची इच्छा बाळगून या गीताची रचना २४ ओळी व सहा कडव्यात सहजतेने जणू प्रकटच झाली. बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय यांनी मातृभूमीचे सुजलाम् सुफलाम् असे दर्शन घेतले त्याच प्रमाणे मातृभूमीचे पिडीत आणि दु:खी रूपही पाहिले.
यातूचन त्यांच्या लेखणीतून बाहेर पडलेला मातृभूमीचा जयघोष हा युद्धमंत्रच होता. वंदे मातरम् या शब्द उच्चारणावरही तत्कालीन इंग्रजी शासनाने बंदी घातली एवढी महती वंदे मातरम् या शब्दाला आणि गीताला लाभली. वंदे मातरम् गीताचे पहिले जाहीर गायन, वंदे मातरम् शब्दाचा सामाजिक प्रभाव, कला क्षेत्रातही वंदे मातरम् गीताला मिळालेले स्थान, अनेक गायक व संगीतकारांना या गीताची पडलेली भुरळ, स्वातंत्र्य मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना वंदे मातरम् गीतास झालेला विरोध, वंदे मातरम् हे राष्ट्रगीत न होता राष्ट्रीय गीत होऊन लाभलेला दर्जा असे विविध टप्पे अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून पुणेकरांसमोर मांडण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पंडित भीमसेन जोशी यांनी देस रागात गायलेल्या वंदे मातरम्ने झाली.
वंदे मातरम् हे गीत फक्त शब्दरूपी नसून हा प्रचंड मोठा उर्जा स्रोत आहे, आजच्या सामाजिक स्थितीत प्रत्येकाच्या मुखी वंदे मातरम् चा गजर होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा वंदे मातरम्चे अभ्यास-संशोधक मिलिंद सबनीस यांनी व्यक्त केली. वंदे मातरम् या गीताचा इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावा या करता मिलिंद सबनीस ध्यास घेऊन कार्य करीत आहेत, असे मत इतिहासाचे अभ्यासक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक संजय भंडारे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, भारत माता आणि बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. हर्डीकर यांचा सत्कार अरुणचंद्र पाठक यांनी केला.