पुणे : पाण्यासाठी माजी नगरसेवक बसले खड्ड्यात
पुणे: (Pune) वडगाव शेरी मतदार संघातील खुळेवाडी परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांपासून पाण्याची समस्या जाणवत आहे. पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने पुणेमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली जात आहे. मात्र पाणीच येत नसल्याने आणि नागरिकांचे तक्रारीचे सातत्याने येत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव (Bhaiyasaheb Jadhav) यांनी पाण्याच्या वॉलच्या खड्ड्यात बसून महापालिकेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच जोवर पाणी येणार नाही तोवर याच खड्ड्यात बसून राहण्याचा इशारा दिला होता. मात्र आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर जाधव खड्ड्यातून बाहेर आले.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा पाऊस कमी झाल्याने आपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे पुणे शहराला पाणी संकट ओढावले आहे. शहराला १५ जुलै पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पाणी पुरवठ्याचे नियोजन ढासळले असल्याचे दिसून येत आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पाणी पुरवठा करताना महापालिकेच्या नाकीनऊ आले आहे. असे असताना उपनगरभागात देखिल सुरळीत पाणी पुवरठा करण्या पालिका अपयशी ठरली आहे. त्यात खराडीसारख्या विकसित भागात देखील पाणी टंचाई जाणवू लागल्याने पाण्याची भीषणता दिसून येत आहे.
खराडीतील थिटे वस्ती, थिटे नगर, चौधरी वस्ती, राघोबा पाटील नगर, बोराटे वस्ती, तुकाराम नगर, सातव वस्ती, गणपती हौसिंग सोसायटी, सुक्रे वस्ती, यशवंत नगर आदी भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी महापालिककडे केल्या जात आहे. तसेच भागात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुवरठा विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातील नागरिकांना पाण्याची टॅंकर विकत घेण्याची वेळ आली आहे. एका टॅंकरसाठी किमान एक हजार रुपये मोजावे लागत असल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे.
खुळेवाडी यापरिसरात देखील पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. माजी नगरसेवकांकडू सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जाधव यांनी थेट पाण्याच्या वॉलच्या खड्ड्यात ठिय्या मांडला.
खराडीतील खुळेवाडी भागात पाण्याची समस्या आहे. येथील नागरिक त्रासले आहेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. अशा तक्रारीदेखील आल्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून आल्याने याच भागातील वॉलचे काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बसून महापालिकेचा निषेध केला. आठ दिवसात पाणीपुवरठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
- भैय्यासाहेब जाधव, माजी नगरसेवक.