संग्रहित छायाचित्र
उद्योगनगरीत कोयता गँगला आवर घालताना पोलिसांची दमछाक होत आहे. मागील वर्षभरात विविध गुन्ह्यात वापर केलेले किंवा प्रयत्नांत असलेले तब्बल ९३० कोयते, तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. मारहाणीच्या घटनांमध्ये कोयता, चाकू, तलवारी यासारख्या धारदार हत्यारांचा वापर वाढत असल्याने पोलिसांनी धरपकड सुरू ठेवली आहे.
वाहनांची तोडफोड करण्यासाठी तर कधी दोन गटातील राड्यामध्ये कोयता उगारला जात होता. याशिवाय दुकानदारांकडून खंडणी वसुली करणे, परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी गुंडाकडून कोयता बाळगला जात होता. त्यामुळे धारदार शस्त्र जप्तीबाबत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी काही उपक्रम हाती घेतले होते. त्यानुसार विविध पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी वर्षभरात ९३० हत्यारे जप्त केली आहेत. कोयता, तलवार अशी हत्यारे बाळगणार्यांवर पोलिसांकडून भारतीय शस्त्र अधिनियम कलमानुसार कारवाई करण्यात येत आहे. केवळ मारहाणीसाठीच नाही तर खून आणि प्राणघातक हल्ल्यामध्येही कोयत्याचा वापर होत असल्याने पोलिसांसमोर कोयताधार्यांचे आव्हान निर्माण झाले होते. गेल्या पाच वर्षांमध्ये खून आणि प्राणघातक हल्ल्यातील किमान निम्म्यापेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये कोयत्यांचा वापर झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. कोयत्याचा धाक दाखवून लूटमार, मारहाणीचेही गुन्हे दाखल आहेत.
शेतमजूर, नारळ, मासे, मास विक्री करणार्यांचे पोट भरण्याचे साधन असलेला कोयता आता दहशत पसरवण्याचे साधनदेखील बनला आहे. टोळके हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करतात. हवेत कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतात. अगदी सहजगत्या उपलब्य होणारा कोयता गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांच्या हातात देखील आला आहे. कोयता सहजा सहजी उपलब्ध होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. परंतु, त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहरात लोखंडी अवजारांची विक्री करणारे फिरस्ते, शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागांमध्ये कृषी अवजारे विक्री करणार्या दुकानांमध्ये कोयता सहज उपलब्ध होतो. त्यामुळे त्यांनी कोणाला कोयत्याची विक्री केली याची नोंद नसते. त्यामुळे आता पोलिसांनीच याबाबत कठोर धोरण हाती घेतले आहे.
सोशल मीडियावर भाईगिरी
भाईगिरीची क्रेझ टवाळखोरामध्ये आहे. अगदी अल्पवयीन मुलेही कोयत्यासोबत रोल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. यातही बहुतांशी जणांना सोशल मीडियाच्या इन्स्ट्राग्राम फेसबुकवर भाईगिरीचा नाद असतो. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याच्या साहाय्याने वाहनांची तोडफोड करीत रिल्स काढले होते, तर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून रिल्स तयार करणार्या कोयताधारी यम भाईलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चित्रपटांचा प्रभाव
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याची क्रेझ आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात मारहाणीचे प्रसंग असतात. तसेच, त्यात कोयत्यासारख्या विविध आकारातील हत्यारांचा वापर केलेले चित्रण दाखविले जाते. याचाच परिणाम मोकाट, टवाळखोरांच्याही मनावर होत असल्याचे शहरातील घटनांमधून दिसून येते.
पाच वर्षांतील जप्त धारदार हत्यारे
वर्ष जप्त: हत्यारे
२०२०: ४४
२०२१: ७९
२०२२: २५६
२०२३: ७०३
२०२४: ९३०
एकूण २०१२