संग्रहित छायाचित्र
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या प्रकरणानंतर बीड सह संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. अशातच या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराडविरोधात मराठा समाजाने पुण्यात तीव्र आंदोलन केले. यावेळी कराड तसेच धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाने या दोघांविरोधात संताप व्यक्त केला.
याचवेळी मस्साजोग प्रकरणात न्यायाच्या बाजूने उभे राहिलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, अंजली दमानिया आणि मनोज जरंगे पाटील यांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
योगेश केदार यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वाल्मिक कराड हा गुन्हेगारच आहे. त्याचे समर्थन केल्याने समाजाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. केवळ ते वंजारी समाजाचे आहेत म्हणून आम्ही विरोध केला नाही हे लक्षात घ्या. आम्ही अजित पवारांचा देखील निषेध करतो. कारण त्यांनी कालपर्यंत आरोपींना वाचवण्याची भूमिका घेतली. आरोपींची बाजू घेणारा मराठा जरी असला तरी त्यांचा आम्ही निषेध करतो. हा वंजारी विरूध्द मराठा असा वाद नाही तर एका विकृत प्रवृत्ती विरूध्द सुरू असलेला लढा आहे.”