कर्मचाऱ्यांच्या ताण कमी करण्यासाठी मेंटल हेल्थ ॲप

पुणे : पुणे महापालिकेत आपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव वाढला आहे. या तणामुळे त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 15 Jan 2025
  • 04:51 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे महापालिका निर्णय, स्थायी समितीसमोर ठेवला प्रस्ताव ॲपचे

पुणे : पुणे महापालिकेत आपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव वाढला आहे. या तणामुळे त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या या ॲपचे दोन हजार युनिट खरेदी केले जाणार असून, यासाठी कंपन्यांनी दिलेल्या सीएसआर फंडातून सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

ॲपचे दोन हजार युनिटसाठी लागणाऱ्या खर्चाला मान्यता घेण्यासाठी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर ॲपची खरेदी केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये १७ ते १८ हजार कर्मचारी काम करतात. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक तणावाला सामोरे जावे लागते. महापालिका कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित आहे. यामध्ये आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन, योग आदी उपक्रमांचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली होती. यामध्ये तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यांची छाननी करून सर्वांत कमी दराची निविदा टचकिन ई-सर्व्हिसेस प्रा. लि. यांची आली आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करताना कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका प्रशासनाने गेल्या दोन ते तीन वर्षात नोकर भरती केली आहे. परंतु अद्याप अनेक जागा रिक्त आहेत. महापालिकेच्या महत्वाच्या कर आकारणी विभागासाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताफा दिला जातो. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची कामे इतरांना करावी लागत आहेत. कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याने कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच इतर काम करायचे असल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा विषय पुढे येतो. त्यामुळे काम कोणाला सांगावे, असा प्रश्न संबंधित प्रमुखांना पडला आहे.  

दरम्यान, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करताना कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांना त्रास होतो. याचा परिणाम आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी महापालिकेने या हेल्थ ॲपची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या ॲपच्या दोन हजार युनिटची खरेदी केली जाणार आहे. एका युनिटसाठी ६ हजार ३७२ रुपये खर्च येणार आहे. मेंटल हेल्थ ॲपच्या दोन हजार युनिटसाठी १ कोटी २७ लाख ४४ हजार रुपये खर्च येणार आहे. हे युनिट दोन वर्षांसाठी घेण्यात येणार आहेत. हा खर्च सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहे, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

Share this story

Latest