पुणे होणार विकसित भारतातील अग्रेसर शहर!
पुणे हे अनेक विद्वानांचे, कलाकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि उद्योजकांचे शहर आहे. पुण्याची क्षमता अफाट आहे. सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या काळात पुणे शहराने देशामध्ये आघाडीवर असणे अपेक्षित आहे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करीत असताना विकसित देश झालेला असेल. त्यात पुणे अग्रेसर असेल आणि कोथरूड, बाणेर, बालेवाडी ही महत्त्वाची आर्थिक केंद्रे असतील. याविषयी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडलेले हे विचार...
अहिंसक सत्याग्रही, सशस्त्र क्रांतिकारक, आंदोलक अशा असंख्य देशभक्तांच्या संघर्षामुळे १९४७ मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आता आपण अमृतकाळात प्रवेश केला आहे. अमृतकाळ म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे ते १०० वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अमृतकाळात देशाला विकसित देश बनविण्याचा निर्धार केला आहे.
मोदीजींच्या नेतृत्वात देशाने गेल्या दहा वर्षांत अशक्य वाटणारी अनेक कामे केली आहेत. अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे, हे कोट्यवधी भारतीयांचे शेकडो वर्षांचे स्वप्न होते. त्यासाठी लाखो लोकांनी संघर्ष केला. हे स्वप्न आता साकार झाले आहे. काश्मीरला भारतापासून अलग करणारे घटनेचे कलम ३७० रद्द व्हावे, यासाठी संघर्ष झाला. देशाच्या घटनेत तात्पुरती व्यवस्था म्हणून सामील केलेले हे कलम कधीच रद्द होणार नाही, असे अनेकांना वाटत असे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निर्धाराने हे कलम रद्द केले. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आणि आता
आगामी पाच वर्षांत ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा निर्धार मोदीजींनी केला आहे. या देशातील प्रत्येकाचे बँक खाते आहे आणि त्यामध्ये सरकारकडून थेट मदत पाठविली जाते. मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांत अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्याची कल्पनाही पूर्वी केलेली नव्हती. देश बदलला आहे, गतीने पुढे जात आहे. आगामी २५ वर्षांत भारत हा जगातील एक प्रमुख विकसित देश होईल, यात शंका नाही.
भारत हा विकसित देश होईल, त्या वेळी त्यामध्ये महाराष्ट्राचे, विशेषतः पुण्याचे स्थान अग्रभागी असेल, असे मला वाटते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आधुनिक काळात देशाला नेतृत्व देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कर्तृत्व या शहरात बहरले. समाजसुधारणेच्या क्षेत्रात क्रांती करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांचे कार्य पुण्यातच घडले. विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे अनेक विद्वानांचे, कलाकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि उद्योजकांचे शहर आहे. पुण्याची क्षमता अफाट आहे. सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या काळात पुणे शहराने देशामध्ये आघाडीवर असणे अपेक्षित आहे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करीत असताना विकसित देश झालेला असेल, त्या वेळी त्या विकसित देशामध्ये आपले पुणे हे अग्रेसर शहर असले पाहिजे, असा माझा आग्रह आहे.
चांदणी चौक : एक आदर्श प्रकल्प
आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुणे शहराने झेप घ्यावी आणि देशातील प्रमुख केंद्र बनावे, या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महायुती सरकारने २०१४ पासून भरीव कार्य केले आहे. हे सांगताना मला आनंद होतो. नव्या चांदणी चौक इंटरचेंजचे लोकार्पण झाले आहे. पुण्याच्या वेशीवर होणारी वाहनकोंडी आणि त्यामुळे होणारा वेळेचा तसेच इंधनाचा अपव्यय या इंटरचेंजमुळे थांबणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा पाठिंबा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी यांची मदत आणि आम्ही केलेला पाठपुरावा यामुळे चार वर्षांत हा अवघड प्रकल्प पूर्ण झाला. चारही बाजूंनी सतत वेगाने धावणारी वाहने, टेकडीवरील खडकाळ जमीन आणि कोविडचे संकट अशी आव्हाने पेलत हा प्रकल्प पूर्ण झाला. चांदणी चौकातील काम सुरू झाले, त्या वेळी ते अशक्य वाटत होते, पण ते कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाले. पुणेकरांची अनेक दशकांची गरज पूर्ण झाली.
पुण्यात मेट्रो साकारली
पुण्यात मेट्रो सुविधा असावी, असा प्रस्ताव २००१ मध्येच आला होता. पण २०१४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार सत्तेवर आले आणि पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली. मेट्रो प्रकल्प हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या नागरी क्षेत्रातील वाहतूक कोंडीवरील रामबाण उपाय ठरतो आहे. मेट्रोने प्रवास करून पुणे रेल्वे स्थानकावरून कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप स्थानकापर्यंत केवळ २० रुपयांत आणि २० मिनिटांत पोहोचता येते. पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि तेथून स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पुणे मेट्रोचे काम कधीच पूर्ण होणार नाही, असे लोक बोलत असत. पण प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. त्यातून लोकांना सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे, हे भाजपा महायुती सरकारचे वैशिष्ट्य आहे. प्रकल्प लटकवायचे नाहीत, तर ते पूर्ण करायचे, हा मोदीजींचा संदेश आहे. त्यांनी ते करून दाखविले आहे. पुण्यातही मेट्रोचा अशक्य वाटणारा प्रकल्प साकारला आहे. आता मोठ्या प्रमाणात मेट्रोचा विस्तार होतो आहे.
भविष्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र
ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचे ज्ञान हेच भांडवल असते. आयटी हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दीर्घकाळची समृद्ध शैक्षणिक परंपरा आणि खूप मोठ्या संख्येने उपलब्ध असलेला युवावर्ग हे अशा अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त भांडवल पुण्याकडे आहे. या बाबतीत देशातील खूप थोडी शहरे पुण्याशी स्पर्धा करू शकतील. पुण्यात अशा अर्थव्यवस्थेमुळे वाढलेली उलाढाल आणि त्यामुळे शहराच्या समृद्धीत पडलेली भर आपण पाहतो आहोत. आगामी काळात या बाबतीत आणखी खूप प्रगती झालेली दिसेल. पुणे शैक्षणिक केंद्र असण्याबरोबरच महत्त्वाचे आर्थिक केंद्र झालेले दिसेल. त्या दृष्टीने पुण्यात वाहतुकीच्या सुविधा अत्याधुनिक असणे आवश्यक आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावरही मेट्रो असावी, असा माझा मानस आहे. इलेक्ट्रिक बस मोठ्या प्रमाणात धावत आहेत. पुणेकरांना स्वस्त, वेगवान आणि सुरक्षित वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी खूप मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. ते पूर्ण करू आणि त्यामुळे पुण्यातील जीवनमान उंचावलेले दिसेल.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेतलेल्या योजना तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पुणे शहरात दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस पाणीपुरवठा होण्यासाठी हाती घेतलेली '२४x७' योजना ही प्रत्येकाला दिलासा देणारी आहे. पुणे शहरातून वाहणाऱ्या नदीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी 'नदी सुधार योजना' हाती घेतली आहे.
आमच्या सरकारने पुण्यातील पायाभूत सुविधांच्या आधारासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि परिसराला क्षमतेनुसार आर्थिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर होणे शक्य होईल. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासामुळे येथील प्रत्येकाला लाभ होणार आहे. रोजगाराची अधिकाधिक निर्मिती होईल आणि जीवनमान उंचावेल. त्यासोबत या महानगर क्षेत्रातील जनतेचे जगणे सोपे व्हावे यासाठी वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, निवास या सर्व बाबतीत आमचे सरकार काम करीत आहे.
पुण्याच्या सर्वांगीण विकासात कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पाषाण या उपनगरांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. येत्या काळात पुण्याच्या विकासाची ती ग्रोथ इंजिन्स असतील, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठबळ शहराच्या विकासाला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे शहरातील सुविधा विकसित करण्यास खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. आगामी काळात मोदीजींच्या नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र होईल आणि त्यामध्ये पुणे हे अग्रेसर शहर असेल, याची खात्री मला आहे.
ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचे ज्ञान हेच भांडवल असते. आयटी हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दीर्घकाळची समृद्ध शैक्षणिक परंपरा आणि खूप मोठ्या संख्येने उपलब्ध असलेला युवा वर्ग, हे अशा अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त भांडवल पुण्याकडे आहे. या बाबतीत देशातील खूप थोडी शहरे पुण्याशी स्पर्धा करू शकतील. पुण्यात अशा अर्थव्यवस्थेमुळे वाढलेली उलाढाल आणि त्यामुळे शहराच्या समृद्धीत पडलेली भर आपण पाहतो आहोत. आगामी काळात या बाबतीत आणखी खूप प्रगती झालेली दिसेल. पुणे हे शैक्षणिक केंद्र असण्याबरोबरच महत्त्वाचे आर्थिक केंद्र झालेले दिसेल.
- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील, आमदार, कोथरूड
उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाजमंत्री, महाराष्ट्र राज्य