पुणे: महापालिकेच्या प्रवेशव्दारावर तृतीयपंथी सुरक्षारक्षकाला उपअभियंत्याकडून मारहाण; जाणून घ्या काय घडले

पुणे: पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. नियमानुसार ओळखपत्राची मागणी केल्याचा राग आल्याने नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंत्याने एका तृतीपंथी सुरक्षारक्षकाला थेट मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) इमारतीत प्रवेश करताना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. नियमानुसार ओळखपत्राची मागणी केल्याचा राग आल्याने नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंत्याने एका तृतीपंथी सुरक्षारक्षकाला थेट मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महापालिकेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत जाताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे. ओळखपत्र नसेल तर नोंदवहीत नोंद करुन प्रवेश दिला जातो. सर्वसामान्यपणे कर्मचारी ओळखपत्र दाखवून प्रवेश करतात. मात्र ओळखपत्र काही कारणास्तव सोबत नसेल तर नोंदवहीत नोंद करतात. महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी कामाकाजासाठी दररोज इमारतीमध्ये येत असतात. त्याप्रमाणे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील ललीत लोढा (Lalit Lodha) नावाचा एक उपअभियंता महापालिकेत त्याच्या कामासाठी आला होता. इमारतीमधून प्रवेश करताना त्याला कर्तव्यावर असलेल्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकाने ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी त्याने ओळखपत्र नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्या सुरक्षा रक्षकाने नोंदवहीत नोंद करण्याची विनंती केली. त्यावर संताप व्यक्त करत मी महापालिकेत गेल्या ३० वर्षांपासून काम करतो आहे. मला ओळखत नाही का असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने समजविण्याचा प्रयत्न केला असता, त्याला थेट मारहाण करण्यास सुरवात केली. भांडण सोडविण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली असता, त्यांनाही मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच महापालिकेच्या आवारात गोंधळ घातला. त्यानंतर महापालिकेत एकच गोंधळ उडाला. इतर सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. उपअभियंत्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत  नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

याच अभियंत्याने विद्युत प्रमुखांना केली होती मारहाण
उपअभियंता ललीत लोढा यांने वाद घालून नवी पेठेतील वैकुंठ स्मशान भूमित काही वर्षांपूर्वी विद्युत विभाग प्रमुखांना देखील मारहाण केली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारत निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर त्याला दोन महिन्यांपूर्वी पुन्हा सेवेत घेण्यात आले असून नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात उपअभियंता पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याचे वागणे शिस्तीला धरुन नसते, तो नेहमीच सहकाऱ्यांसोबत वाद घालत असतो. तसेच तो महापालिकेच्या आवारात वारंवार वाद घालत असतो. असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तसेच अशा वादग्रस्त व्यक्तीमुळे महापालिकची बदनामी होत असल्याने त्याला सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमधून होऊ लागली आहे. 

पुणे महापालिकेने तृतीय पंथीयांना दिला आहे मानसन्मान...
तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार तृतीय पंथीयांना महापालिकेच्या सेवेत सहभागी करून घेतले. सुरक्षा विभागात ते सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांना महापालिकेने सन्मान दिल्याने त्यांच्या आयुष्यात वेगळे रंग भरला आहे. लोकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्यामुळे इतर तृतीयपंथीय देखील मुख्यप्रवाहात येऊ इच्छीत आहे. त्यांचे मनोबल वाढलेले असताना एका महापालिकेच्याच कर्मचाऱ्याने मारहाण करणे योग्य नसल्याची चर्चा रंगली असून मारहाण केल्याने उपअभियंत्यावर संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. तृतीय पंथीय सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याने दोषी अभियंत्यावर कठोर शासन करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest