पुणे : शहरासाठी ७.२५ टीएमसी पाणी राखीव ठेवा ; पाणी संकटामुळे पुणेकर धास्तावले

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठा कमालीचा घटला आहे. सध्या ९.४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला जुलै पर्यंत सव्वापाच टीएमसी पाण्याची गरज आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठा कमालीचा घटला आहे. सध्या ९.४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला जुलै पर्यंत सव्वापाच टीएमसी पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बाष्फीभवनामुळे धरणातील सुमारे दीड टीएमसी पाणी कमी होणार आहे. त्यामुळे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने शहरासाठी ७.२५ टीएमसी पाणी राखीव ठेवावे अशी मागणी सजग नागरिक मंचाने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. (Pune PMC) 

महापालिकेकडून शहरासह उपनगर भागाला समान पाणी पुरवठा करण्यास अपयश आले आहे. त्यात धरण साखळीत पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा झाला. त्यामुळे शहरावर पाणी संकट ओढावले आहे. सध्या खडकवासला धरण साखळीत ९.४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुणे शहरासाठी दरमहा १.६ टीएमसी पाण्याची गरज आहे. ३१ जुलै पर्यंत ५.२५ टीएमसी पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बघता पुढील तीन महिन्यात किमान सव्वा ते दीड टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होऊ शकते. जून महिन्यात वारीसाठी किमान अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. तसेच मे महिन्यात दौंडसह इतर गावांना पिण्यासाठी दीड टीएमसीचे आवर्तन सोडावे लागेल. त्यामुळे पाणी राखीव ठेवण्याची मागणी सजग मंचाने केली आहे.   महापालिका दरवर्षी सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध करुण देते, त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही, असेही मंचाचे म्हणणे आहे.

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. महापालिकेने नुकतेच  १२०० वरुन १४०० टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे वाद होत आहे. तसेच अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १५ जुलै पर्यंत पाणीपुरेल असा दावा केला आहे. मात्र महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागेल, त्यानंतरच हा पाणीसाठा पुरेल असेही बोलले जात आहे. परंतु लोकसभा निवडणुकीवर पाणी कपातीचा मोठा परिणाम होण्याची भीती राजकीय नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे पाणीकपातीवर सध्या तरी कोणी बोलण्यास तयार नाही. एक दिवसा आड नसले तर आठवड्यातून एकदा तरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागेल, असे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी बोलत आहेत. मात्र ही केवळ चर्चा ठरत असून धोरणात्मक निर्णय हा कालवा समितीतच होणार आहे. त्यासाठी १३ मेच्या मतदानाच्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे. कितीही आता चर्चा केल्यातरी कोणतागही निर्णय होणार नाही. त्यामुळे सध्या जसे सुरु आहे तसेच सुरु ठेवून नागरिकांच्या तक्रारींवर मार्ग काढला जाईल, असे सांगण्याशिवाय अधिकाऱ्यांकडे दुसरे काहीही नाही.

तक्रारी कमी झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा

 शहरासर उपनगर भागातून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे एका आठड्यात सुमारे १ हजारहून अधिक तक्रारी येत होत्या. पाणी कमी दाबाने येत आहे, पाण्याची पाईलप लाईन फुटली आहे, जास्त दाबाने पाणी सोडावे, नळ जोड देण्यात यावा, घाण पाणी येत आहे, या व अशा अनेक तक्रारींचा पाऊस पाणीपुरवठा विभागावर पडत होता. एका आठवड्यात एक हजारहून अधिक तक्रारी येत होत्या. मात्र या तक्रारी सोडविल्या जात असून आता या तक्रारींचे प्रमाण कमी होऊन ३०० वर आल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात सुरु होईल अशी भीती लोकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत ७.२५ टीएमसी पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश उपमुख्यमत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला द्यावे आणि पुणेकरांना आश्वस्त करावे.

  -  विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच,  पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest