पुणे : भीमराव तापकीरांसंबंधी लावला फलक; निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंगाचा गुन्हा
पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. सध्या राजकीय पक्षांचा आणि उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचला आहे. निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचे उल्लंघन होते आहे का यावर बारीक नजर ठेवली जात आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट गुन्हा दाखल केला जात आहे. अशाच प्रकारचा गुन्हा भाजपाचे आमदार आणि खडकवासल्याचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या नावाने फलक लावल्याने दाखल करण्यात आला आहे.
आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. यातील एक गुन्हा तापकीर यांच्या नावाने लावलेल्या फलकासंबंधी आहे. तर दूसरा गुन्हा मनसेच्या निवडणूक कचेरीशी संबंधित आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील मानस सोसायटी ते क्रिस्टल कॅस्टल सोसायटी या दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामाची माहिती लोकांना व्हावी याकरिता याठिकाणी एक फलक लावण्यात आलेला होता. त्यावर ‘रहिवाशांना होणाऱ्या तसदी बद्दल क्षमस्व, भारतीय जनता पक्षाचे खडकवासाला मतदार संघाचे उमेदवार भीमराव आण्णा तापकीर यांच्या विकास निधीतून’ असा मजकूर नमूद करण्यात आलेला होता. या फलकावर सौजन्य म्हणून सारंग भोसले असे नाव देखील लिहिण्यात आलेले होते. हा प्रकार आचारसंहिता भंगाचा असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार अनुराग राजेशकुमार यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयूरेश वांजळे यांच्याशी संबंधित आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी न घेता वांजळे यांच्या प्रचार कार्यालयामोर वाहने उभी करण्यात आलेली होती. या वाहनांवर पक्षाचे चिन्ह आणि छायाचित्र लावण्यात आलेले होते. हा देखील आचारसंहितेचा भंग असल्याने या प्रकरणी दोन मोटारचालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.