पुणे : कचरा वेचकांनी दिला माणुसकीचा धडा : अडचणीच्या काळात आपल्या मैत्रिणीला आर्थिक मदत करून दिला आधार

दिवसेंदिवस एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या, स्पर्धेत ईर्ष्या बाळगण्याच्या आणि आत्मकेंद्रित होत चाललेल्या आजच्या काळात, धनकवडीतील ५० हून अधिक कचरा वेचकांनी निःस्वार्थीपणा, सहवेदना समजून घेण्याची क्षमता आणि स्वतःच्या कठीण परिस्थितही दुसऱ्याचे दुःख कमी करण्याची भावना याचे प्रेरणादायी उदाहरण शहरासमोर ठेवले आहे.

पुणे : कचरा वेचकांनी दिला माणुसकीचा धडा : अडचणीच्या काळात आपल्या मैत्रिणीला आर्थिक मदत करून दिला आधार

पुणे : दिवसेंदिवस एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या, स्पर्धेत ईर्ष्या बाळगण्याच्या आणि आत्मकेंद्रित होत चाललेल्या आजच्या काळात, धनकवडीतील ५० हून अधिक कचरा वेचकांनी निःस्वार्थीपणा, सहवेदना समजून घेण्याची क्षमता आणि स्वतःच्या कठीण परिस्थितही दुसऱ्याचे दुःख कमी करण्याची भावना याचे प्रेरणादायी उदाहरण शहरासमोर ठेवले आहे. मुलीचे अनेक दिवसांचे आजारपण आणि त्याचा खर्च भागवू न शकणाऱ्या आपल्या सहकारीला मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ५७०० रुपयांचा निधी स्वतः उभा करत निरपेक्ष मदत केली. (Pune News) 

स्वच्छच्या कचरा वेचक संगीता जाधव (Sangita Jadhav) यांना, आपली मुलगी गीता हिच्या गंभीर खोकल्याच्या उपचारासाठी झगडावे लागले. आजारपण सुरू झाल्याच्या महिनाभरानंतर क्षयरोग झाल्याचे निदान झाले. वाढता खर्च आणि असहायता यामुळे आगतिक झालेल्या संगीता यांनी आपल्या कचरा वेचक मैत्रिणीकडे, विद्या नाईकनवरे (Vidya Naiknaware) यांच्याकडे मदत मागितली.

परिस्थितीचे गांभीर्य समजून विद्या यांनी सहकारी कचरा वेचकांपर्यंत संगीताच्या परिस्थितीची माहिती गांभीर्याने दिली आणि धनकवडी-सहकार नगरमध्ये काम करणाऱ्या ५० हून अधिक कचरा वेचकांनी, तसेच काही पुणे मनपा कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन उदार हस्ते प्रत्येकी ५० ते ५०० रूपये दिले. गोळा झालेले ५७०० रूपये संगीताला देऊन तिच्या कठीण परिस्थितीत पैशांच्याच रूपाने नाही तर मानसिक आधार देत मदतीचा हात दिला. अनपेक्षितपणे मिळालेल्या या मदतीने भावूक झालेल्या संगीता आपल्या कचरा वेचक मैत्रिणींना मिठी मारत म्हणाल्या, “जेव्हा कोणीही माझ्यासाठी उभे राहिले नाही, तेव्हा माझे स्वच्छचे कुटुंब पुढे आले आणि त्यांनी ही मदत केली. मी माझ्या सर्व मैत्रिणींची ऋणी आहे, त्यांच्या स्वतःच्या समस्या असूनही, माझ्या कठीण काळात मला आधार देण्यास मागेपुढे पाहिले नाही. आमच्यासाठी, स्वच्छ ही केवळ एक संस्था नाही तर आमचे कुटुंब आहे. माझ्या मैत्रिणींनी ते पुन्हा सिद्ध केले आहे.”

 बोर्ड सभासद, कचरा वेचक, स्वच्छच्या विद्या नाईकनवरे म्हणाल्या, “आम्ही नेहमी एकमेकांच्या बाजूने उभे असतो. आमच्या या एकजुटीनेच आम्हाला आमची स्वतःची संस्था, स्थान आणि ओळख निर्माण करण्यास मदत केली आहे. अडचणीच्या काळात कचरा वेचकांना मदत करणे हा आमचा स्वभाव आहे. आम्ही संगीताला काळजी करू नकोस असे सांगितले. प्रत्येकाची अवघड परिस्थिती असूनही प्रत्येकाने कसे योगदान दिले याची जाणीव ठेवण्यास सांगितले आणि मुलीच्या उपचारांसाठी पैसे योग्य रीतीने खर्च करण्यास सांगितले.”

ही हृदयस्पर्शी घटना कचरा वेचकांची एकमेकांना आधार देण्याची बांधिलकी अधोरेखित करते. तसेच स्वच्छ व कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत या संस्थांनी कचरा वेचकांमध्ये खोलवर रुजवलेल्या सहकार्य, सौहार्द आणि बंधुभाव या मूल्यांचे एक उत्तम उदाहरण देखील देते. फक्त स्वतःपुरते व स्वतःसाठी जगण्यासाठी अनेक कारणे असताना देखील, पुण्यातील कचरा वेचकांनी, निःस्वार्थीपणा, सहवेदना व सामूहिक कृतीमधून एकमेकांच्या साथीने उभं राहण्यासाठी किंवा दारोदार कचरा संकलन करण्यासाठी, आपली एकजूटीची मशाल तेवत ठेवली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest