घराचा दरवाजा अचानक लॉक झाल्यामुळे ७१ वर्षीय वृद्ध महिला घरात कोंडली गेली. त्यांना घरामधून बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यातच ही महिला बेशुद्ध पडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली.
ही घटना गुरुवारी (दि. ७) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली. नागरिकांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून कोंढवा येथील लुल्लानगरमधील एका इमारतीमध्ये घरात वयोवृध्द महिला अडकल्याची माहिती कळवली. नियंत्रण कक्षाने तातडीने कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना केले.
दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होताच उपस्थितांकडून घटनेची माहिती घेतली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात ७१ वर्षीय वृद्ध महिला मुख्य दरवाजा अचानक बंद झाल्याने अडकल्या असून त्या बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. जवानांनी तत्परतेने ‘हायड्रोलिक कॉम्बो किट’चा वापर करुन मुख्य दरवाजा उघडला. घरामध्ये प्रवेश करून पाहणी केली. घरातील पंलगावर ही महिला बेशुध्दावस्थेत पडल्याचे आढळून आले. दलाच्या जवानांनी त्यांना शासकीय रुग्णवाहिकेमधून डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचारांकरिता रुग्णालयात हलवले. त्यांची प्रकृती सद्यस्थितीत चांगली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सदर वृद्ध महिला घरात एकट्याच राहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अगदी योग्य वेळेत घटनास्थळी दाखल होत त्यांचे प्राण वाचवले. या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहनचालक सत्यम चौखंडे, तांडेल महादेव मांगडे तसेच जवान निलेश वानखेडे, सागर दळवी, हर्षद येवले, मनोज भारती, हर्ष खाडे यांनी सहभाग घेतला.