संग्रहित छायाचित्र
पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी प्रचारादरम्यान खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करून पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
खराडी भागात झालेल्या प्रचार फेरीमध्ये त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन हे आश्वासन दिले. यावेळी प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. यशवंत नगर, बोराटे नगर, राघवेंद्र नगर, तुकाराम नगर, शेजवळ पार्क, सोनाई पार्क, विडी कामगार वसाहत परिसरात पठारे यांनी झंझावती प्रचार केला. प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.
बापूसाहेब पठारे म्हणाले, "खराडी-शिवणे रस्ता झाल्यास नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. एक चांगला पर्यायी मार्ग म्हणून संपूर्ण मतदारसंघासोबतच पुणेकरांना मोठा फायदा होईल. मागील १० वर्षात या रस्त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करण्यात आले. हा रस्ता कुणी रखडवला? वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू शकणारा हा रस्ता अर्धवट का सोडला? असे अनेक प्रश्न आहेत.
खराडी-वडगावशेरी-कल्याणीनर-वारजे-शिवणे नदीकाठच्या रस्त्याचे काम तातडीने पुर्ण व्हावे, यासाठी मी वारंवार तत्कालीन शासनकर्ते, पालकमंत्री, महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. परंतु, हे काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, असेही पठारे यांनी सांगितले.
या पदयात्रेच्या प्रसंगी माजी राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण सहभागी होत्या. या पदयात्रेत सहभागी होत त्यांनी बापूसाहेब पठारे नक्की निवडून येतील यात काही शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला. "आमदारकीच्या काळात पठारे यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली असून, त्याचा फायदा मतदानात त्यांना होणार आहे. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून ते या मतदारसंघाला न्याय देतील", असेही त्या म्हणाल्या.