संग्रहित छायाचित्र
कधीकाळी ऐसपैस रस्त्यामुळे ओळखला जाणारा सिंहगड रस्ता परिसर आता वाहतूक कोंडीचे नवे केंद्र बनला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडीत भर पडली असून त्याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते नांदेड सिटीपर्यंत अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात.
रस्त्यावर मंदगतीने सुरू असणारे उड्डाणपुलाचे काम, वाहनांची वाढती संख्या यामुळे सिंहगड रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी होताना दिसते. या वाहतूक कोंडीचा सामना करतच हिंगणे खुर्द, नऱ्हे, धायरी, वडगाव, नांदेड सिटी, किरकटवाडी आणि खडकवासल्यातील चाकरमान्यांना दररोज प्रवास करावा लागतो.
कार्यालयीन वेळेत होते सर्वाधिक कोंडी
अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमण व दुतर्फा पार्किंग, रिक्षा थांबा, भाजी विक्रेते आणि गेल्या ३ वर्षांपासून सुरू असणारे उड्डाणपुलाचे बांधकाम या सर्वांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सिंहगड रत्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.
सकाळी कार्यालयात जाण्यासाठी आणि रात्री घरी परतण्याच्या वेळी संपूर्ण रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. उड्डाणपुलाचे काम २०२४ मध्ये पूर्ण होणार असल्याचे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले होते. मात्र हे वर्ष संपत आले तरीही पुलाचे काम अजून सुरूच आहे. त्यामुळे मागच्या तीन वर्षांपासून वाढलेली वाहतूक कोंडी कमी होण्याचे नाव घेत नाही. वाहतूक कोंडीपासून सिहगड रस्ता कधी मुक्त होणार, असा प्रश्न त्रस्त प्रवासी आणि नागरिक विचारत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. काम पूर्ण झाले की सुधारणा होईल. गेल्या दोन दिवसांपासून वाहतुकीत सुधारणा झाली आहे. जोशी स्वीटसमोरील रस्ता मोकळा झाला आहे. चार महिन्यांत पुलाचे काम होईल, त्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही.
- राजकुमार बरडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग
मी दवाखान्यात काम करते. दिवसभर दवाखान्यात काम करून संध्याकाळी या वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो. पीएमपीत बसायला जागा मिळत नाही. संध्याकाळी ६ वाजता कामावरून सुटल्यानंतर घरी जायला रात्री ८ वाजतात. या वाहतूक कोंडीमुळे स्वयंपाक करून जेवायला दररोज रात्री उशीर होतो. सकाळी कामावर जातानापण त्रास होतो.
- प्रभावती कांबळे, खडकवासला
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.