संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर ३० येथील कन्व्हेनियन्स शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गाळेधारकांकडून शुल्क आकारण्यात आले. मात्र, देखभाल-दुरुस्तीसह कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. यामुळे गाळेधारकांनी पीएमआरडीएवर नाराजी व्यक्त करत प्रतिगाळा जमा केलेले देखभाल-दुरुस्ती शुल्क परत घेण्यासाठी पीएमआरडीएकडे अर्ज केला आहे. यावर प्रशासनाकडून लागलीच हालचाली सुरू असून, देखभाल, साफसफाईची निविदा काढण्यात येणार आहे.
पीएमआरडीए अंतर्गत सेक्टर ३०, ३२ येथे कन्व्हेनियन्स शॉपिंग सेंटर विकसित करण्यात आले असून त्यातील गाळ्यांचा ताबा मागील वर्षी देण्यात आला. शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या दैनंदीन देखभाल दुरुस्तीसह गाळेधारकांना तत्सम सुविधा देण्यासाठी ६४ हजार ५०० इतके शुल्क आकारण्यात आले. या कामासाठी गाळेधारक आणि पीएमआरडीए यांच्यात कायदेशीर करार झाला. शुल्क जमा करुन दहा ते अकरा महिने उलटले तरी पीएमआरडीएकडून कसल्याही सुविधा पुरवल्या नसल्याची तक्रार गाळेधारकांनी केली आहे. शॉपींग सेंटरमधील विद्युत वापराचे कॉमन वीज बिल महावितरणशी संबंधित विद्युत कार्यालयात जमा केले नाही. परिणामी, महावितरणकडून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विद्युत प्रवाह खंडित केला आहे. सोसायटी स्थापन करण्याची प्रक्रिया करुन देण्याचे आश्वासन दिले होते.
अद्याप ती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. गाळेधारकांच्या मालमत्तेची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे नोंद केलेली नाही. शॉपिंग सेंटरमध्ये हक्काचे नळ कनेक्शन नाही. त्याबाबत पालिकेकडे पत्रव्यवहार केलेला नसल्याचे देखील पत्रात म्हटले आहे. लिफ्टसाठी बॅकअप बॅटरी उपलब्ध नाही. प्रत्येक मजल्यावर बाल्कनीमध्ये पाणी साचते. परिणामी, दुकानांमध्ये पाणी शिरत असून त्याचा गाळाधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याला आऊटलेट करुन दिलेला नाही.
स्वच्छतागृहातील नळ व इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. वारंवार कळवूनही त्याठिकाणी नवीन वस्तू बसवण्यात आलेल्या नाहीत. देखभा-दुरुस्तीअभावी स्वच्छतागृहांची अशी अवस्था झाली आहे. इमारतीच्या परिसरातील इंटरलॉक ब्लॉक्स व रॅम्प काढले आहे. काम पूर्ण केल्यानंतर त्यांनी हे ब्लॉक्स व्यवस्थित बसवले नाहीत. परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी पीएमआरडीए प्रशासनावर नाराजी व्यक्त करत देखभाल-दुरुस्तीसाठी जमा केलेले शुल्क परत करावेत, अशी मागणी करत गाळेधारकांनी अर्ज केला आहे. गाळेधारक गणेश जाधव, विजय लंके, वरुण पोकळे, मोहिनी भोंडवे, स्वप्नील शिराळ, स्वप्नील भालेकर, सुयोग चोपडा, मच्छिंद्र कुमावत, योगेश बेलदार, सुहास मवाळ, रितेश भावसार, शैलेश हंडी यांच्यासह २८ जणांनी शुल्क परत करण्याची मागणी केली आहे.
गाळेधारकांशी याबाबत चर्चा झालेली आहे. सोसायटी स्थापन करण्याबाबत त्यांना सुचवले आहे. तसेच, इतर कामासंबंधीत निविदा काढण्यात येणार आहेत. त्यांच्या सर्व समस्या दूर केल्या जातील. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- रश्मी पाटील, उपभियंता,
अभियांत्रिकी विभाग, पीएमआरडीए
पाच दुकाने विक्रीसाठी शिल्लक
या ठिकाणी पाच दुकानांची विक्री गेली नाहीत. विकलेल्या गेलेल्या गाळेधारकांच्या या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. त्यामुळे आधी आमच्या समस्या सोडवा मगच ती दुकाने विक्रीला काढा, अशी मागणी देखील या माध्यमातून करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.