'शांतता... पुणेकर वाचत आहेत' उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शहरात ठिकठिकाणी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Wed, 11 Dec 2024
  • 07:50 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

शांतता... पुणेकर वाचत आहेत

सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रमात सहभाग,

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत शहरात ठिकठिकाणी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकारण, सामाजिक, साहित्य, कला, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ पुण्यातच नाही, तर राज्य, देशभरातून आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला. 

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाअंतर्गत भव्य पुस्तक प्रदर्शनासह विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम, बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने वाचन चळवळ वृद्घिंगत करण्यासाठी बुधवारी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम राबवण्यात आला. सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, गणेश मंडळे, शासकीय कार्यालये, ग्रंथालये अशा विविध ठिकाणी दुपारी १२ ते १ या वेळेत पुस्तकांचे वाचन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमात सहभागी होऊन वाचन करतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांत पोस्ट केली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कोथरूडचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, अभिनेत्री विभावरी देशपांडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, लेखक किरण यज्ञोपवीत, रमेश परदेशी, ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये, उद्योजक पुनीत बालन, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक अशा अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच समता भूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले मंडई, अंधशाळा, मेट्रो स्थानक, पुणे महापालिका अशा ठिकाणी पुस्तक वाचन करण्यात आले.

पुण्यातील ऐतिहासिक अप्पा बळवंत चौक येथे झालेल्या उपक्रमात आमदार चंद्रकांत पाटील सहभागी झाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, की 'शांतता... पुणेकर वाचत आहेत, हा उपक्रम महत्त्वाचा आहे. आयुष्यात वाचनाला फार महत्त्व आहे. वाचनामुळे आयुष्याला दिशा मिळते, दृष्टी मिळते, मन मोठे होते. राजकारण्यांनीही मन मोठे करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. अनेक राजकारणी उत्तम वाचक, लेखक आहेत. वाचनासाठी एकाग्रता लागते. आजच्या काळात वाचनाच्या पद्धती बदलल्या आहेत. ऑडिओ बुक्स उपलब्ध झाली आहेत. पुस्तके मोबाईलवर मिळतात. महाराष्ट्रातील ११ हजार सार्वजनिक वाचनालयांमुळे वाचनाची चांगली संस्कृती आहे. या ग्रंथालयांना राज्य सरकारकडून ४०० कोटी रुपये अनुदान दिले जाते.

'शांतता... पुणेकर वाचत आहेत' उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. २७ हजारांहून अधिक छायाचित्रे पाठवण्यात आली आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता पुणे पुस्तक महोत्सव अधिक व्यापक होईल असा विश्वास वाटतो, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest