संग्रहित छायाचित्र
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या रस्त्यावरील अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. या कामामुळे एकीकडे वाहतूक नियोजनाचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप होत आहे. तर, दुसरीकडे या कामामुळे रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांवर संकट आले आहे. काम करताना बांधकामाचा राडारोडा झाडांच्या मुळाजवळ टाकला जात आहे. प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
दापोडी ते निगडी या १२.५० किलोमीटर अंतराच्या मार्गावर १८३ फूट रुंदीचा प्रशस्त ग्रेड सेपरेटर मार्ग आहे. दोन पदरी बीआरटी मार्ग आहे. याच रस्त्यावर पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळा ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ५.१६ किमी अंतराचे ४९ कोटी ८१ लाख ८ हजार ३६२ रुपये खर्चाचे, तर पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळा ते दापोडीतील हॅरिस पूल-अंतर-६.५४ किमी आणि ९३ कोटी ७८ लाख ५२ हजार ४६० रुपये खर्चाचे अर्बन स्ट्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात ठेकेदार, अधिका-यांकडून हे काम करताना अनेक चुका केल्या जात आहेत. काम सुरू असताना, तसेच काम झाल्यानंतर बांधाकामाचा राडारोडा, कचरा रस्त्याच्या कडेने असलेल्या झाडाच्या मुळाजवळ टाकला जातो.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरच सुरू असलेल्या कामात हे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये वड, पिंपळ अशा देशी झाडांचा समावेश आहे. बांधकामाचा राडारोडा टाकल्यामुळे ही झाडांना धोका पोहचून ते नष्ट होण्याची शक्यता वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. परंतु, अधिकारी, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी संबधित ठेकेदाराला झाडांबाबत काळजी घेण्याची तंबी देण्याची गरज आहे. दरम्यान, नवीन रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या वृक्षतोड करण्यात येते. विकासकामांसाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते. तोड केलेल्या वृक्षांच्या जागी रस्त्याच्या कडेला झाडांचे रोपटे लावले जात नाही. त्या झाडांची पूर्ण वाढ होईपर्यंत महापालिकेने त्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वृक्षांचे आयुष्य धोक्यात, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
पर्यावरणाचे संतुलन राहण्यासह संरक्षण आणि संवर्धन व्हावे, याकरिता रस्त्यांच्या दुतर्फा देशी प्रकारची झाडे महापालिकेच्या रस्त्यावरील फुटपाथवर लावली होती. त्या झाडांचे संगोपन व्हावे, झाडे लावण्याच्या त्यांची वाढ नीट व्हावी, यासाठी झाडांभोवती संरक्षण जाळ्या देखील लावण्यात आलेल्या होत्या. महापालिका रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. झाडांना दररोज पाणी सुध्दा देण्यात येत नाही. मात्र, झाडांच्या संगोपनासाठी झाडांना संरक्षण जाळी बसविण्यात आली होती. तरीही काही झाडांच्या जाळ्या काढून त्या झाडांची नासधूस केली जात आहे. त्यामुळे झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे. लागवड करण्यात आलेल्या झाडांपैकी काही झाडे सुस्थितीत आहेत. इतर वृक्षांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.