संग्रहित छायाचित्र
पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक या विस्तारित ४.५ किमी एलिव्हेटेड मार्गिकेचे काम सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १३ पिलरची उभारणी पूर्ण झाली आहे. तर, २०१ सेगमेंट कास्टिंग करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, आठ महिन्यांत १३ पिलर उभारण्यात आले असून, अजून तब्बल १५१ पिलर उभारण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे हे काम मुदतीमध्ये होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजमितीस केवळ १५ ते २० टक्केच काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा-१ स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडीचे काम सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होऊन टप्पा- १ वरील प्रवासी सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मेट्रोकडून मार्ग आणि माती सर्वेक्षणचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आता प्रत्यक्षामध्ये पिलर आणि पाया उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते.
तब्बल १३८ पिलरचे काम बाकी
चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्त्ती चौक या ठिकाणी पाया बांधण्याचे, सेगमेंट कास्टिंग आणि पिलर बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या आठ महिन्यात १३ पिलर उभारण्यात आले असून १३८ पिलरचे काम बाकी आहे. तर, १५१ पैकी २८ पाया खोदण्यात आलेले आहे. १३३७ पैकी २०१ सेगमेंट कास्टिंग तयार झालेले आहेत. त्यातच विविध ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न आणि इतर परवानगी यामुळे काम पुढे मागे होऊ शकते.
बीआरटी मार्गाचा बळी
मेट्रोचे काम सुरू असल्याने सर्वाधिक मोडतोड ही बीआरटी मार्गाची होणार आहे. रस्ता, बॅरिगेट त्याचप्रमाणे दोन बस थांबा देखील संपूर्णपणे तोडण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी बस थांबा उभारणे अवघड जाणार आहे. तसेच, मार्ग देखील अरुंद झाल्याने बीआरटी मार्ग पुन्हा सुरू होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे हे काम दिलेल्या मुदतीच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. पिंपरी ते निगडी मेट्रो लवकरच मार्गावर धावेल.
-हेमंत सोनवणे,
कार्यकारी संचालक, महामेट्रो
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.