Punekar : मुके बिचारे पुणेकर कसेही हाका!

अनेक समस्या पुणेकरांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. दिवस निघाला की दररोज या समस्या आ वासून उभ्या असतात... खड्डेयुक्त रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी या समस्यांशी सर्वसामान्य पुणेकराला दररोज भिडावे लागते. यात आता वीजपुरवठा खंडित होण्याचीही भर पडली आहे. भर उन्हाळ्यात नव्यानेच ही समस्या उद्भवल्यामुळे पुणेकरांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Ankit Shukla
  • Sat, 20 May 2023
  • 03:01 pm
मुके बिचारे पुणेकर कसेही हाका!

मुके बिचारे पुणेकर कसेही हाका!

खड्डेयुक्त रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीनंतर आता भर उन्हाळ्यात वीजपुरवठादेखील खंडित

अंकित शुक्ला

feedback@civicmirror.in

अनेक समस्या पुणेकरांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. दिवस निघाला की दररोज या समस्या आ वासून उभ्या असतात... खड्डेयुक्त रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी या समस्यांशी सर्वसामान्य पुणेकराला दररोज भिडावे लागते. यात आता वीजपुरवठा खंडित होण्याचीही भर पडली आहे. भर उन्हाळ्यात नव्यानेच ही समस्या उद्भवल्यामुळे पुणेकरांचा जीव मेटाकुटीस आला आहे.

 पाॅवर ग्रीड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शिक्रापूर ते तळेगाव मार्गावरील ४०० केव्ही अतिउच्च क्षमतेच्या चारपैकी दोन वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला. गुरुवारी (दि. १८) सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी ही समस्या उद्भवताच पुणे तसेच पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी, पिंपरी, पुनवळे, वेल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव या भागांतील सुमारे ३ लाख ५५ हजार नागरिकांना तसेच चाकण एमआयडीसीला याचा फटका बसला.

अचानक ही समस्या उद्भवल्याने घरात राहणारे, लहान-मोठे व्यापारी यांना मनस्ताप सहन करावा लागला. कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित झाल्याने लोक संतापले होते. अशा प्रकारे वीज गेल्यामुळे व्यापारी आणि एमआयडीसीतील कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. भांडारकर रस्ता, गल्ली क्रमांक १० येथे वास्तव्यास असलेल्या शिल्पा गोडबोले म्हणाल्या, ‘‘गुरुवारी सकाळी १०  ते संध्याकाळी ६ पर्यंत आमच्याकडे वीज नव्हती. साधारणपणे इतक्या वेळ वीज जाणार असेल तर तशी पूर्वसूचना दिली जाते. मात्र, काल अशी कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. आमच्या घराबाहेर काही कामगार वीजपुरवठ्याशी संबंधित खोदकाम करीत होते. लाल बाॅक्समध्ये बिघाड झाल्याचे त्या कामगारांच्या बोलण्यावरून कळले. पुण्यात प्रचंड ऊन तापत असताना भरदुपारी ते हे काम करत होते. हा मला मोठा विनोद वाटला.’’

अनपेक्षितपणे अशा रितीने वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच व्यावसायिक समस्या निर्माण झाल्या. यामुळे वीजपुरवठ्याशी संबंधित यंत्रणेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दिवसभर वीज नसल्याने आमचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडले होते. वैद्यकीय उपकरणांवर अवलंबून असलेले रुग्ण आणि इंटरनेट सेवेशी संबंधित काम करणाऱ्यांना तर प्रचंड त्रास झाला, असे राधिका हरपळे यांनी सांगितले. धानोरी येथील रहिवासी सचिन ठोंबरे म्हणाले, ‘‘या  तीव्र उन्हाळ्यात पाणी आणि वीज या गोष्टी अत्यावश्यक आहेत. मात्र, गुरुवारी दोन्ही नसल्याने लाखो पुणेकरांची प्रचंड गैरसोय झाली.’’

‘‘पिंपरी हे होलसेल विक्रीचे केंद्र आहे. गुरुवारी सामान्य नागरिकांबरोबरच एमआयडीसी भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येतात. मात्र, वीज नसल्याने त्या दिवशी बाजारपेठांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दुरुस्ती करायचीच होती तर ती मंगळवारी करता आली असती. त्या दिवशी मार्केट बंद  असते. खडकी, चाकण, तळेगाव, हिंजवडी अशा दूरवरच्या ठिकाणांहून ग्राहक आले होते. महावितरणने आधी कल्पना दिली असती तर व्यापाऱ्यांनी काही पर्यायी व्यवस्था केली असती,’’ असे  पिंपरी ट्रेडर्स फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.

पाॅवर ग्रीड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शिक्रापूर ते तळेगाव मार्गावरील ४०० केव्ही अतिउच्च क्षमतेच्या चारपैकी दोन वीजवाहिनीत गुरुवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे महावितरणने आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले. यामुळे महापारेषणचा चाकणमधील ४००, २२०, १३२ केव्ही, चिंचवडमधील २२० केव्ही, ऊरसे येथील २२० केव्ही तर खराडीमधील १३२ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

तळेगावजवळील करंजेविहीर येथे एक उच्च दाबाचा पाईप तुटला आणि दुसऱ्या पाईपवर कोसळल्याचे पाहणीत आढळून आले. अदानी कंपनी आणि महापारेषणचे अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून त्याची दुरुस्ती केली. ‘‘४०० केव्ही क्षमतेच्या अतिउच्च क्षमतेच्या वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवली होती. पाहणीनंतर ही तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला,’’ असे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest