संग्रहित छायाचित्र
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभा राज्यभरात नियोजित करण्यात आलेल्या आहेत. पुण्यात देखील मंगळवारी (१२ नोव्हेंबर) सभा नियोजित करण्यात आलेली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त तसेच सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मोठा फौजफाटा देखील तैनात केला जाणार आहे. या दौरा कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लाडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कडक कारवाईचा इशारा सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.
पंतप्रधानांचा ताफा जाणाऱ्या लोहगाव विमानतळापासून पुढील सर्व मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सभेच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पॅराग्लायडर, हलकी विमाने (मायक्रो लाइट एअरक्राफ्ट), हॉट एअर बलून देखील उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी बाळगली जात आहे. हॉटेल, लॉजची आणि संशयितांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रीय सुरक्षा दलाची पथके देखील तैनात करण्यात आलेली आहेत. दौऱ्याच्या संपूर्ण मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून केली जात आहे. यासोबतच सर्व केंद्रीय व राज्यस्तरीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.