पुणे विभागातील तब्बल ६,५९४ मतदान केंद्रांचे होणार वेब कास्टिंग

पुणे विभागातील आठ विधानसभा मतदारसंघात एकूण ८,४६२ मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी तब्बल ६,५९४ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग केले जाणार आहे. तब्बल ८८,४९,५९० मतदार ईव्हीएमद्वारे उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 19 Nov 2024
  • 01:45 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सार्वत्रिक विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी संपली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून २० नोव्हेंबर रोजी मतदानाची जय्यत तयारी केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे विभागातील आठ विधानसभा मतदारसंघात एकूण ८,४६२ मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी तब्बल ६,५९४ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग केले जाणार आहे. तब्बल ८८,४९,५९० मतदार ईव्हीएमद्वारे उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.  

‘‘मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल,’’ असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.

मतदार ओळखपत्र नसल्यास १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य
छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू न शकणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्रासह पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले  छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा.

जिल्ह्यात ३७ कोटी ४४ लाख रुपये रक्कम जप्त
निवडणूक आयोगाच्या टीमसह स्थानिक पोलीस पथकांनी पुणे जिल्ह्यात विविध भागात गाड्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रचार सुरू झाल्यापासून १८ नोव्हेंबरपर्यंत तब्बल ३७ कोटी ४४ लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली असून शासकीय कोषागार येथे जमा केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे गृहमतदान पूर्ण
८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या १,९२५ ज्येष्ठ नागरिकांनी गृहमतदानाचा हक्क बजाविला. दिव्यांग ३३९ व्यक्तींनी गृहमतदान केले. टपालाद्वारे अनुपस्थित २,१६५ मतदार तर निवडणूक कर्तव्यांवर असलेल्या १५,६०२, शासकीय सेवेतील ५,६०५ तर ईटीपीबीएसद्वारे ५,६०५ मतदान झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest