संग्रहित छायाचित्र
पुणे : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना (Students of Dhangar community) पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या (English medium)नामांकित निवासी शाळामध्ये प्रवेश देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (Jyoti Kadam) यांनी दिल्या. यासाठी जिल्ह्यात दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासाठी पुणे जिल्ह्यातील दोन शाळांची निवड करण्यात आली आहे.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे, यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देण्यास राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजनाबरोबर इतर सोई-सुविधा शासनाकडून मोफत पुरविल्या जातात.
यासाठी पुणे जिल्ह्यातील दत्तकला इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज स्वामी चिंचोली (ता. दौंड) व श्री व्यंकटेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल वालचंदनगर (ता. इंदापूर) या दोन शाळांना मान्यता देण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. जिल्ह्यातील धनगर समाजातील पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घेता येतो.
समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे विविध विषय व योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे कदम यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांच्या उपस्थित आयोजन करण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.