संग्रहित छायाचित्र
चाकण औद्योगिक वसाहतीत कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघामध्ये दोघांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत शुक्रवारी (दि. १) दुपारी दीडच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर महाळुंगे (ता. खेड) येथील बजाज कंपनीपासून काही अंतरावर हा अपघात घडला. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर उलटला.
कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अमोल हिरामण केदारी (वय २२) व गणेश भगवान पारथी (वय ३०, दोघेही रा. चंदनवाडी, ता. मावळ, जि. पुणे) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास तळेगाव बाजूकडून येणाऱ्या केदारी आणि पारधी यांच्या दुचाकीस समोरून आलेल्या भरधाव कंटेनरने जोरात धडक दिली. त्यानंतर कंटेनर पुढे जाऊन उलटला.
या अपघातात दुचाकीवरील केदारी आणि पारधी हे गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दुचाकीस्वारांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, हे दोन्ही तरुण दिवाळीनिमित्त पिकअप जीप खरेदी करण्याकरिता चाकण येथे येत असताना हा अपघात झाला. ऐन दीपावली सणातच या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने केदारी व पारधी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.