संग्रहित छायाचित्र
रात्रगस्तीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना आता व्हॉट्स ॲप ग्रुप वर लोकेशन पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील वॉकीटॉकीवर स्वतः कॉल द्यावा लागणार आहे. नियंत्रण कक्षाने रात्री चारवेळा वरिष्ठ अधिकाऱ्याचे लोकेशन घ्यायचे आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून काढलेल्या या आदेशामुळे कामचुकार पोलिसांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षांपासून पोलीस दलात व्हॉट्स ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळे बहुतांश कामे सोपी तसेच जलद झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने गस्तीवर वॉच ठेवण्याचे महत्वाचे काम व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून होत आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नुकतेच अंमलदार आणि पोलीस अधिकारी यांच्या लोकेशन बाबत एक आदेश जारी केला आहे. यामध्ये रात्रगस्त दरम्यान पोलिसांचे लोकेशन तपासणी बाबत सूचित करण्यात आले आहे.
आयुक्तालय हद्दीत, राञगस्त प्रभारी अधिकारी म्हणुन पोलीस उपायुक्त तर सहाय्यक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परीमंडळीय स्तरावर प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवाना होताना त्यांनी पोलीस ठाणे, घटनास्थळ भेट आणि राञगस्त संपलेनंतर नियंत्रण कक्षास स्वतः कॉल द्यायचा आहे.
नियंत्रण कक्षातील प्रभारी आधिकाऱ्याने रात्रगस्त कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी यांचे चार वेळा लोकेशन घ्यायचे आहे. नियंत्रण कक्षाकडून लोकेशन घेत असताना संबंधित पोलीस अधिकारी यांनी स्वतः उत्तर द्यायचे आहे. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी/बीट मार्शल यांचे दर दोन तासाला लोकेशन घ्यावे लागणार आहे. संबंधित अधिकारी आणि बीट मार्शल हेदेखील स्वतः कॉलला उत्तर देतील, असे पोलीस आयुक्त चौबे यांनी काढलेल्या आदेशात नमूद असल्याने अनेकांची अडचण झाली आहे.
अन्यथा कर्तव्यात कसुरी अहवाल
रात्रगस्त दरम्यान नियंत्रण कक्षाला लोकेशन देणे बंधनकारक असणार आहे. लोकेशन प्राप्त नसलेल्या पोलिसांचा कसुरी अहवाल दररोज सकाळी दहा वाजता नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी पोलीस आयुक्तांकडे सादर करणार आहेत.
परस्पर बदल नको
यापूर्वी रात्रगस्त तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कर्तव्य बजावण्यात येत नव्हते. रात्रगस्ती दरम्यान काहीतरी कारणे समोर करून बदल केले जात होते. मात्र, यापुढे आता पोलीस उपायुक्त/सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकारयांनी पोलीस आयुक्तांच्या आणि परीमंडळीय व विभागीय रात्रगस्त प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी अपर पोलीस आयुक्त यांच्या पुर्वपरवानगी शिवाय राञगस्तीत बदल करु नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खोटे लोकेशन येईल अंगलट
नियंत्रण कक्षकडून आलेल्या कॉलला काहीजण चुकीचे लोकेशन देत असल्याचे वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्ये एका कर्मचाऱ्यास खोटे लोकेशन दिल्या प्रकरणी तडकाफडकी निलंबितदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाला खोटे लोकेशन देणे पोलिसांचा अंगलट येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी. तसेच, नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळवा, यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे. नाकाबंदीसह रात्रगस्तीच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. - विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.