गाजावाजात लावली, पाण्याअभावी करपली
मोठा गाजावाजा करत वृक्षारोपणाचे (Plantation) कार्यक्रम आयोजित करायचे पण या झाडांच्या देखभालीची व्यवस्था करायची नाही,असा पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) उद्यान विभागाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे मोठा खर्च करून रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे पाण्याअभावी जळून चालली आहेत.
स्मार्ट सिटीत गणल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षाबाबत महापालिकेची उदासीनता दिसत आहे. बेसुमार वृक्षतोड होत असताना दुसरीकडे रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. लांडेवाडी ते शांतीनगर या रस्त्यावर डझनभर झाडांची अशीच अवस्था झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाला जाग येण्यासाठी नागरिकांनी विभाग प्रमुखाकडे झाडे वाचवण्यासाठी साकडे घातले आहे. अन्यथा थेट महापालिका आयुक्तांपुढे कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
उद्यान विभागाने सुमारे चार वर्षांपूर्वी तत्कालीन अधीक्षक गोरखनाथ गोसावी यांच्या माध्यमातून मोठ्या थाटामाटात लांडेवाडी ते शांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एस ब्लॉकमध्ये झाडे लावली होती. झाडे सात ते आठ फूट उंच गेल्यावर पाणी मिळत नसल्याने ते पाण्याअभावी जळाली आहेत. तर, काही झाडे गायब झाली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे जळाली असून खड्डेही रिकामे झाले आहेत. एका बाजूला पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हजारो झाडे लावण्याचा दिखावा करते, दुसऱ्या बाजूला उद्यान विभाग झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. उद्यान विभागाला या झाडांना पाणी देण्यासाठी वेळ नाही का, असा सवाल ह्यूमन राइट्स असोसिएशन या संघटनेतर्फे संबंधित विभागाला पत्राद्वारे विचारण्यात आला आहे.
रस्त्याच्या पदपथावर या झाडांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. उद्यान विभागाणे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील नागरिकांना आपल्या प्रांगणातील अडथळा ठरत असलेले झाडाच्या फांद्या काढायचे झाल्यास उद्यान विभाग अनेक अटी घालतात. पर्यायी झाड लावण्याचा आग्रह धरण्यात येतो. त्या अटी पूर्ण केल्यानंतरच झाड तोडण्याची परवानगी देते. तर मग उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे, झाडांना वेळेवर पाणी न दिल्यामुळे ही झाडे जात आहेत, यासाठी जबबादार कोण? सर्वसामान्य नागरिकांना लागू होणारा नियम उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना का लागू होत नाही ,कर्तव्यात कसूर केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्या वर पण सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे कार्यवाही करण्याचे धाडस उद्यान विभाग दाखवेल का, असे प्रश्न
स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. या बाबत उद्यान अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून त्यावर आण्णा जोगदंड, मीना करंजावणे, मुरलीधर दळवी, संगिता जोगदंड, रवी भेंकी, गजानन धाराशिवकर, अँड सचिन काळे, राहुल शेंडगे, पंडित वनसकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
..तर आयुक्तांनी लक्ष घालावे
महापालिकेच्या उद्यान विभागावर संबंधित विभाग प्रमुख दुर्लक्ष करत असल्याने, नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. शहरातील झाडांची देखभाल होताना दिसत नाही. उद्यान विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, ते टाळाटाळ करतात. शहरातील उद्यानांचीही देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून आयुक्तांनी समक्ष लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.