Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाचे जेसीबीतून पुष्पवृष्टीकडे लक्ष

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अलीकडे उमेदवारांना क्रेनद्वारे फुलांचा हार घालणे, जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्याचा नवा ट्रेंड दिसून येत आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणूक प्रचारात उमेदवारावर जेसीबीतून पुष्पवृष्टीच्या नव्या ट्रेंडची निवडणूक आयोगाने घेतली दखल; प्रति तास १४०० रुपये मोजावे लागणार, घोड्यावरून प्रचार केल्यास तासाला एक हजार रुपये, प्रचार साहित्याचे दर निश्चित

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अलीकडे उमेदवारांना क्रेनद्वारे फुलांचा हार घालणे, जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्याचा नवा ट्रेंड दिसून येत आहे. त्याशिवाय क्रेनला फलक लावण्यात येत आहे. या नव्या ट्रेंडची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून उमेदवारांवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करणार असाल तर  मोठ्या हारासह जास्तीत जास्त प्रति तास १,४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून प्रचार, साहित्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यात जेसीबीतून पुष्पवृष्टी, घोड्यावरून प्रचार यासाठीदेखील दर निश्चित करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने अशाप्रकारे प्रचारातील नव्या ट्रेंडची दखल घेतल्यामुळे उमेदवाराच्या प्रचारखर्चाला कात्री लावावी लागणार आहे.  

शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहात आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांच्या प्रचार सभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच अलीकडे लोकसभेसह विधानसभा उमेदवारांच्या स्वागताचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहेत. उमेदवारांच्या प्रचारात ठिकठिकाणी जेसीबी बकेटमधून उमेदवारांवर झेंडू आणि गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येत आहे. फुलांचा वर्षाव करणारे खास मशीन यासाठी मागविण्यात येत आहे.

३०० ते ५०० किलोंचे हार
मशिनगनमधून उमेदवारावर फुलांचा जोरदार वर्षाव केला जात आहे. ठिकठिकाणी क्रेनद्वारे सुमारे ५०० किलो फुलांचे हार घालत त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्याशिवाय सोबतीला बॅंडपथक, ढोल-ताशा पथकासह ओपन जीपमधून त्यांची मिरवणूक काढली जात आहे. मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये आणि डीजेच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारानिमित्त उमेदवारांचे जंगी स्वागत क्रेनच्या स्वागत हारांनी केल्याने फुलाची मागणी वाढली आहे. हे स्वागत हार अगदी ३०० ते ५०० किलो आणि काही तर त्यापेक्षाही अधिक किलो वजनाचे तयार केले जात आहेत. या हारांसाठी झेंडू, गोंडा, गुलाब व इतर फुले आणि पानांचा वापर केला जात आहे.  

फुलांना मोठी मागणी
लोकसभेनंतर विधानसभेत देखील निवडणुकीत गुलाल उधळण्याचा ट्रेंड होता. बदलत्या काळानुसार फुलांचे स्वागत, हारतुरे बुके यांची मागणी वाढली. त्यामुळे फुलशेतीला प्रचंड महत्व आले आहे. निवडणुकीत फुलांच्या विविध प्रकारच्या हारांची मोठी मागणी वाढली आहे. निवडणूक उत्सव, जत्रा प्रचार रॅली, मिरवणूक राजकीय नेत्यांची सभा यामध्ये सध्या क्रेनचा वापर करत फुलांचा मोठा हार क्रेनला अडकवला जातो.

साधारणपणे २५ ते ३० फूट उंचीचा स्वागत हार असतो. जेसीबी क्रेन मशीनला अडकून तयार केलेला उंच स्वागत हार हा नेत्यांच्या स्वागताचे आकर्षण ठरत आहे. निवडणुकीच्या प्रचारात तसेच निवडणुकीनंतरच्या मिरवणुकीत जेसीबीच्या लोखंडी हौद्यामध्ये तसेच बकेटमध्ये फुलांच्या पाकळ्या भरून त्या नेत्यावर अथवा उमेदवारावर उधळण्यात येत आहेत.

जेसीबीमधून उधळण्यासाठी फुलांचे हार सध्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आकर्षण ठऱत आहे. यासाठी गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे फुलांना मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांना चांगला भाव मिळत आहे. फुलांना किलोला २०० ते २५०  रुपयांचा भाव मिळू लागला आहे. स्वागतहारांच्या किमती काही हजार रुपयांवर गेल्या आहेत. काही उमेदवार हा खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट करतात तर काही उमेदवार करत नाहीत.  

विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराला प्रचारावर  ४० लाख रुपये खर्च करण्याची मुभा दिली आहे. या खर्चाच्या रकमेपेक्षा जास्त खर्च होणार नाही, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

असे आहेत प्रचार साहित्याचे दर
पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. यासाठी खासगी वाहनांची मागणी जोर धरू लागली आहे. प्रचारासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर वाहनांचा वापर करावा लागत आहे. उमेदवार टू व्हीलर, फोर व्हीलर आणि तीन चाकी वाहनासह जीपचा वापर करत असेल तर प्रति किमी २७ रुपये दराने खर्चाची नोंद होत आहे.  

 उमेदवार घोड्यावरून प्रचाराला आला तर तासाला एक हजार मोजावे लागणार आहेत घोडागाडीतून आला तर ताशी १,३०० रुपये खर्च करू शकतो. उमेदवार व्हॅनिटी व्हॅन घेऊन निघाला असेल तर प्रतिदिन २५ हजार रुपये खर्च करू शकतो. प्रचाराच्या कालावधीत बाइक रॅली काढताना एका बाइकला ताशी १८ रुपये खर्च करता येणार आहे. त्यानुसार बाइक रॅलीमधील सर्व दुचाकी वाहनांचा खर्च ताशी १८ रुपये याप्रमाणे नोंद करावा लागणार आहे.

प्रचारासाठी रुग्णवाहिकेची गरज लागली, तर दोन तासांसाठी २,५०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही. टेम्पो, ट्रक, बस, घोडागाडी आदीवर उमेदवार किती रक्कम खर्च करू शकतो, याचे दर निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत. त्यामध्ये २४ तासांसह १०० किलोमीटर अंतरासाठी एकूण इंधन, चालक आणि मदतनिस यांच्यावर कमीत कमी २,४८० पासून ते ११,५०० रुपयांचा दर निश्चित केला आहे. याशिवाय प्रति तासाचे भाडे कमीत कमी १२० रुपये ते ७२० रुपये आणि प्रति किलोमीटरसाठी १६ ते ६० रुपये दरआकारणी केली आहे. त्यानुसार होणाऱ्या खर्चाची नोंद उमेदवाराला करावी लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest