संग्रहित छायाचित्र
पिंपरीपासून ते निगडीपर्यंत मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील एकमेव अत्यंत चांगल्या स्थितीत सुरू असलेला बीआरटी मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. सातत्याने कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येत असून, परिणामी या मार्गावर वाहतूक करण्यासाठी पीएमपी बसला अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच बिआरटी मार्गावरी काही स्थानके देखील काढण्यात येणार असल्याने हा मार्ग भविष्यामध्ये पुन्हा सुरू होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निगडी ते आकुर्डी बीआरटी मार्ग बंद होण्याची चिन्हे आहेत.
पुणे महानगर महामंडळाच्या परिवहन (पीएमपीएमएल) बसमधून जलद प्रवास करता यावा, म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट मार्ग (बीआरटी) बांधले आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात एकूण नऊ बीआरटी मार्ग आहेत. या सर्व मार्गांवर ७२० बस चालवल्या जात आहेत. पुण्यातील बहुतांश बीआरटी मार्गाची दुरवस्था झाली आहे, तर काही बीआरटी मार्ग बंद झाले आहेत; पण पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच बीआरटी मार्ग पूर्ण क्षमतेने सुर आहे. शहरातील चार मार्गापैकी हा एकमेव मार्ग विनाअडथळा सुरू आहे. त्यामुळे प्रवासी वर्गदेखील वाढला होता. मात्र आता मेट्रोच्या कामामुळे हा मार्ग सातत्याने बंद ठेवावा लागत आहे.
वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर येरवडा ते आपले घर बीआरटी मार्गाची दुरवस्था झाली होती. पुणे-नगर महामार्गावर वारंवार होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी गुंजन टॉकीज चौक ते हयात हॉटेलपर्यंतचा बीआरटी मार्ग काढून टाकण्यात आला आहे. आता पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावरील निगडी ते आकुर्डीपर्यंतचा बीआरटी मार्ग बंद होण्याच्या वाटेवर आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो सुरू झाल्यानंतर पिंपरी ते निगडीपर्यंतचा मेट्रो मार्ग विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक या विस्तारित ४.५१ किलोमीटर एलिव्हेटेड मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकात, आकुर्डीत पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे. निगडीतील पवळे ब्रीज येथील बीआरटी मार्ग खोदण्यात आला आहे. त्यामुळे निगडी ते आकुर्डी बीआरटी लेन बंद करण्यात आली आहे; पण ही लेन कायमचीच बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण मेट्रो पिलर टाकल्यानंतर रस्ता अरुंद होणार आहे. त्यामुळे बीआरटी मार्गिकाच बंद होण्याची शक्यता आहे.
एकाच मार्गावर दोन वाहतूक सेवा नको
निगडी ते दापोडी या मार्गावर पीएमपी सेवेचा प्रवासी लाभ घेतात. मात्र भविष्यामध्ये यास मार्गावर मेट्रो सुरु होणार आहे. त्यामुळे एकाच मार्गावर दोन सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याने दोन्ही सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या मार्गावरील बीआरटी सेवा बंद करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून निर्णय होऊ शकतो.
मेट्रोच्या कामामुळे बीआरटी काही वेळा बंद असते. मात्र त्याबाबत निश्चितता नाही. नेमके किती दिवस हे काम सुरू आहे याबाबत कळवण्यात आलेली नाही. - सतीश गव्हाणे, बीआरटी प्रमुख, पीएमपीएमएल
पिंपरी ते दापोडीदरम्यान
बीआरटी आणि मेट्रो दोन्ही एकाच मार्गावर आहेत. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर बीआरटी मार्गिका पूर्ववत करण्यात येईल. - बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.