संग्रहित छायाचित्र
भोसरी येथे पाण्याची टाकी पडून पाच कामगारांचा दुदैवी मृत्यू झाला. तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणखी जाग येत आहे. बोपखेल - रामनगर सी.एम.ई रस्त्यावर सीमा भिंतीलगत बांधकाम धोकादायक झाले आहे. त्यामुळे हे बांधकाम पडून एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल - रामनगर सी.एम.ई सिमा भिंती लगत सुशोभीकरणाची कामे केलेली आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी केलेली कामे अत्यंत निकृष्ट पध्दतीने केल्यामुळे ते बांधकाम कधी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
त्याच रस्त्यावरून बोपखेल रामनगर-गणेशनगर भागातील नागरिक सीमा भिंतीलगत ये - जा करत असतात. सकाळी लहान मुलांना घेऊन त्यांचे आई-वडील फूटपाथ, रस्त्यावरून जात असतात. सगळेच नागरिक पादचारी मार्गाचा वापर करतात. ज्येष्ठ नागरिक विश्रांतीसाठी बसतात.
दररोज शेकडो लहान मुले, त्यांचे पालक रस्त्यावरून ये - जा करतात. त्यामुळे हे बांधकाम कधीही त्यांच्या अंगावर पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून फूटपाथवरील हे बांधकाम निष्कासित करण्याची मागणी केलेली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासन कुठला अपघात घडण्याची वाट पाहात आहे का? बोपखेल रामनगर रस्त्याच्या कडेला बनवण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या ढाचा पडण्याच्या अवस्थेत आहे. शाळेची लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक या रस्त्याच्या वापर करत असतात. त्यामुळे हा बांधकाम सांगाडा पडून जीवितहानी झाली तर ह्याला सर्वस्व महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, अशा इशारा भाग्यदेव घुले यांनी दिला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.