संग्रहित छायाचित्र
मेट्रोच्यावतीने गेल्या वर्षभरापूर्वी पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात पार्किंग व्यवस्था उभी करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. मात्र, गेल्या नऊ महिन्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील एकाही पार्किंग सेवेचा शुभारंभ करता आला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वाहनांच्या पार्किंगसाठी जागा घेण्यात आला आहेत. त्यासाठी आवश्यक ती पूर्तता न केल्याने अखेर पार्किंग उभे राहिले नाही. त्यामुळे आता या जागा पार्किंग ऐवजी व्यवसायिक वापरासाठी केला जाणार आहेत. तर, पार्किंग व्यवस्था गुंडाळण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी ते स्वारगेटपर्यंत विस्तारित मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पिंपरी आणि पुणे हे दोन शहरे मेट्रो मार्गाने जोडल्यामुळे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांना घर ते मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) फीडर सेवा सुरू करण्यात आली आहे. पण, बसची वांरवारिता, वेळ आणि प्रशासनाचे अयोग्य नियोजन यामुळे फीडर सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येतो. त्यामुळे पुन्हा प्रवाशांची खाजगी वाहनांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मेट्रोने प्रवासी संख्या वाढवली असली तरी, त्यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेणारे मेट्रो प्रशासनस दुसरीकडे, स्थानकालगत असलेली बेशिस्त पार्किंग आणि बकालपणा दिसून येत नाही.
प्रवासी मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी स्वतःची वाहने घेऊन येतात. पण, स्थानकांवर वाहनांची पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे पदपथावर, रस्त्यावरच वाहने पार्किंग करावी लागत आहे. रस्त्यावर वाहन पार्किंग केल्यावर वाहतूक पोलिस फोटो काढून ऑनलाइन दंड लावतात. या वाहनधारकांना हजारो रुपयाचा दंड वाहतूक पोलिसांनी आकारलेला आहे. त्यामुळे एकीकडे मेट्रोचा प्रवास करताना आपल्या वाहनाला दंडाबाबत प्रवाशांची घालमेल असते. मात्र, याचे कोणतेही सोयरे सुतक मेट्रो प्रशासनाला नसल्याची दिसून आले.
महामेट्रोने मेट्रो स्टेशनवर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मेट्रो प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील आठ स्थानकांवर पे ॲॅण्ड पार्क सुविधा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्याचे दरही निश्चित केले होते. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून काही जागा हस्तांतरित केल्या होत्या. मात्र नऊ महिन्यातच प्रशासनाने निर्णय बदलला आहे. आता या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासन प्रवाशांच्या सुविधांऐवजी उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित करत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
फुकट वापर कधीपर्यंत?
सद्यस्थितीमध्ये वल्लभनगर येथील एसटी स्थानकालगत असलेल्या मेट्रोच्या पार्किंग जागेवर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात आहेत. ही जागा जवळपास ४ हजार चौरस मीटर आहे. या ठिकाणी मेट्रो प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मोफत पार्किंग आहे. मात्र, हे पार्किंग नेमकं कधीपर्यंत असणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेट्रो प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच प्रवाशांच्या वाहनांना पार्किंग सुविधा देणे शक्य नाही. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत - हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.