दिवाळीच्या सुट्टीच्या काळात प्रवाशांना गावाला जाण्यासाठी पीएमपीसोबतच महामार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची बस, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सला प्रचंड गर्दी होती. मात्र, दुसऱ्या बाजूला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मेट्रोत मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला. मेट्रोच्या दोन्ही मार्गावर एरवी पावणेदोन लाख असलेली दैनंदिन प्रवासी संख्या कमी होऊन एक लाखाच्या खाली आली होती. विशेष म्हणजे स्थानकेही ओस पडली होती. दिवाळीमध्ये मेट्रोचा प्रवास वाढेल अशी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती मात्र ती फोल ठरली.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात कामानिमित्त स्थायिक झालेल्या परजिल्ह्यांतील नागरिकांची संख्या जास्त आहे. यातील बहुतांश दिवाळीत गावी जाऊन सण साजरा करतात. त्यामुळे गावी जाणाऱ्या एसटी, रेल्वे आणि ट्रॅव्हल्सला प्रंचड गर्दी असते. मात्र, याच कालावधीत शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या मेट्रोत शुकशुकाट पाहायला मिळाला. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान पिंपरी ते स्वारगेट (लाइन १) आणि वनाज ते रामवाडी (लाइन २) या दोन्ही मार्गावर दैनंदिन प्रवासी संख्या आणि उत्पन्न घटल्याचे दिसून आले. रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी मेट्रोचा वापर करतील अशी अपेक्षा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे काही निदर्शस आले नाही. उलट पक्षी खाजगी ऑनलाइन वाहनांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भर दिला.
लाइन १ या मेट्रो मार्गावर दोन लाख ८७ हजार ५७ प्रवाशांनी, तर लाइन २ या मेट्रो मार्गावर दोन लाख ९४ हजार ९८२ प्रवाशांनी प्रवास केला. या सहा दिवसांत सर्वात कमी शुक्रवारी (दि. १) लाइन १ वर २३ हजार ३८० आणि पुणे मेट्रोच्या लाइन १ या मेट्रो मार्गावर ९३ हजार ४५६ आणि लाइन २ या मेट्रो मार्गावर ९० हजार २४५ प्रवाशांनी २० ऑक्टोबर रोजी प्रवास केला होता. या दोन्ही मार्गावर एकाच दिवशी एकूण १ लाख ८३ हजार ७०१ प्रवाशांनी केला होता. १ नोव्हेंबरला केवळ ४४ हजार ६४८ प्रवाशांनी प्रवास केला. लाइन २ वर २१ हजार २६८ प्रवाशांनी प्रवास केला. दिवाळीनिमित्त शाळा, कॉलेज आणि कार्यालयांना असणाऱ्या सुट्या आणि शहरातील बहुतांश नागरिक गावी गेल्यामुळे प्रवासी संख्येत मोठी घट दिसून येते.
एसटी आगाराला तीन लाखांचे उत्पन्न
दिवाळी निमित्त जादा बसच्या माध्यमातून वल्लभनगर एसटी आगाराला तीन लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. चार दिवसात आगाराच्या ३८ फेऱ्या पार पडल्या. दीड हजार प्रवासी नोंद झाली आहे. त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी पेक्षा ४७ हजारांनी उत्पन्न वाढले आहे. यंदा आगाराच्या उत्पन्नात दोन लाख ९३ हजारांची भर पडली आहे. पुणे विभागाने दिलेले १८ हजार ५६५ किलोमीटर टारगेट पूर्ण केले. नाशिक आणि सोलापूर या मार्गावर यंदा जादा बस सोडण्यात आल्या. जादा बसच्या नियोजनातून दोन लाख ४६ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. यंदाच्या वर्षी दोन लाख ९३ हजार एवढे उत्पन्न मिळाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.