संग्रहित छायाचित्र
चिंचवड विधानसभेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी अर्ज दाखल केला होता. सोमवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काटे यांनी आपला अर्ज मागे घेत
शंकर जगताप यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे रवी लांडगे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनीही माघार घेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
चिंचवडमध्ये महायुतीतील भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांची काटे यांच्यामुळे डोकेदुखी वाढली होती. नाना काटे यांनी माघार घ्यावी म्हणून अजित पवार यांनी त्यांच्या घरी भेट देत माघार घेण्यास सांगितले होते. तरीही काटे हे निवडणूक लढविण्याबाबत ठाम होते. मात्र, अचानक सूत्रे हलली आणि काटे यांनी चिंचवडमधून उमेदवारी अर्ज मागे घेतला. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काटे यांना सुमारे एक लाख मते मिळाली होती. त्यामुळे काटे यांनी अर्ज माघारी घेतल्याने महायुतीतील भाजप उमेदवार शंकर जगताप यांची ताकद निश्चित वाढली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक, युवा मोर्चोचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांनी विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश केला. तेव्हा भोसरीतून लांडगे यांना विधानसभेचे तिकीट मिळणार होते. मात्र, भोसरी विधानसभा ही मविआतून राष्ट्रवादी (शरद पवार ) गटाला जागा गेल्याने राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांना तिकीट मिळाले. त्यानंतरही रवी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, मविआ नेत्यांनी रवी लांडगे यांची समजूत घालण्यात यश मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे भोसरीचे विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांचे तगडे आव्हान निर्माण झाले असून अजित गव्हाणे यांचे बळ वाढले आहे.
विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. महायुतीच्या घटक पक्षातील बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तसेच शहरातील नेत्यांनी समजूत काढली. तर महाविकास आघाडी मधील रवी लांडगे यांची समजूत काढत त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले. रवी लांडगे यांनी उमेदवारी मागे घेत अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
अपक्ष म्हणून निवडून आल्याने रवी लांडगे यांचा वैयक्तिक मतदार मोठा आहे. रवी लांडगे यांचे कुटुंब मूळचे भाजपचे असल्याने भाजपमधीलही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते रवी लांडगे यांच्या पाठीशी आहेत.
२१ जणांनी घेतली माघार
पिंपरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, माघार घेतलेल्या २१ पैकी १९ अपक्ष उमेदवारांनी महायुतीचे पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पिंपरी मतदारसंघात महायुतीचे पारडे निश्चित जड झाले आहे. अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दिल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.