पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट फूड नावाची खाद्य संस्कृती भरमसाठ वाढली आहे. या स्ट्रीट फुड व्यवसायाची दुसरी भयावह बाजू समोर आली आहे. या चायनीजच्या गाड्या आणि हॉटेल चालकांचे उरलेले कच्चे मांस रस्त्यावरील भटक्या कुत्रांना दिले जाते. या मांसक्षणामुळे भटकी कुत्री अधिक आक्रमक होऊन पिसाळण्याची शक्यता वाढली आहे. या प्रकाराची वाच्यता सोशल मिडियाच्या माध्यमातून जागृक नागरिकने केल्यामुळे यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
आकुर्डी रेल्वेस्थानक परिसर तरुणांचा गप्पांचा अड्डा आहे. या ठिकाणी तरुणांचा वाढता वावर लक्षात घेऊन या परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, कॅफे, चायनीज आणि फूड मॉल अल्पावधीतच उभे राहिले. उपनगरांमधील अनेक खवय्येदेखील येऊ लागले. ग्राहकांची संख्या जशी वाढू लागली तशी या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी आता वाढू लागली. कारण, आत्तापर्यंत या ठिकाणी येणारी ग्राहकांची संख्या मर्यादित होती. परंतु अलीकडच्या काळात ती वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर बेशिस्त पार्किंग वाढत आहे. त्याबरोबरच रोड रोमिओंची डोकेदुखी भेडसावू लागली. त्यातच आता भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या एक मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या परिसरात राहणाऱ्या एका दक्ष नागरिकाने नुकताच एक धक्कादायक प्रकार नागरिकांच्या समोर आणला आहे. या परिसरात जवळपास ४० ते ५० छोटे-मोठे हॉटेल्स आहेत. फूड मॉल मध्ये ही अनेक छोटी दुकाने आहेत. या ठिकाणी येणारा मांसाहारचे उरलेले तुकडे, शिळे अन्न या परिसरातील श्वानांना टाकण्यात येतात. विशेष म्हणजे अनेकदा कच्चे मांस त्यांना दिले जात आहे.
पशुवैद्यकीय विभागाने घेतली दखल
आकुर्डी परिसरातील या प्रकरणाची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत पशुवैद्यकीय विभागाला मिळाली. त्यानुसार त्यांनी या प्रकरणाची माहिती घेण्याची सूचना विभागातील कर्मचाऱ्यांना केली आहे. त्या ठिकाणाची पाहणी करून त्याबाबत कार्यवाही केले जाईल, अशी माहिती दिली. तसेच शहरांमध्ये हा प्रकार घडू नये यासाठी देखील उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.