संग्रहित छायाचित्र
शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघांतील गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार महापालिका, सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थांच्या समन्वय बैठकीत करण्यात आला आहे. शहरातील २५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, गृहनिर्माण संस्थांना मतदार जनजागृतीसाठी आवश्यक असलेले साहित्य महापालिका देणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय बैठक पार पडली. उपायुक्त अण्णा बोदडे, मतदार नोंदणी अधिकारी पंकज पाटील, महापालिका निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघांतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुषंगाने महापालिकेमार्फत शहरात विविध माध्यमातून अनेक ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मतदारांच्या सोयीसाठी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकूण गृहनिर्माण संस्थांपैकी १५ मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये २५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.