संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून ३० जूनपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांनाच कर सवलतीचा लाभ देण्यात येणार असून, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना कर सवलतींचा फायदा घेण्यासह मालमत्ताकर भरण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने मालमत्ताकरावर दिलेल्या विविध सवलतींचा लाभ घेत तब्बल साडेतीन लाखांहून अधिक करदात्यांनी आतापर्यंत तब्बल ४०७ कोटींहून अधिक कराचा भरणा केला आहे. यामध्ये तीन लाख २५ हजार नागरिकांना आपला चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरून थकीत कराचाही भरणा केला आहे. आतापर्यंत नागरिकांनी तब्बल २८५ कोटींचा कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे.
अशा आहेत सवलती...
३० जूनपूर्वी मालमत्ताकराची रक्कम ऑनलाइन स्वरूपात भरल्यास १० टक्के
फक्त महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी मालमत्तेच्या सामान्य करावर ३० टक्के
पर्यावरणपूरक इमारती, सोसायट्यांसाठी,कंपोस्टिंग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना ५ ते १० टक्के
ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १५ टक्के
दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के
स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी यांच्या एका निवासी घरास ५० टक्के
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले असल्यास मालमत्तेस २ टक्के
संरक्षण दलातील शौर्यपदकधारक, माजी सैनिकांना मालमत्ताकरात १०० टक्के
महापालिकेच्या कर आकारणी, कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या घसघशीत सवलतींचा शहरातील साडेतीन लाखांहून अधिक करदात्यांनी लाभ घेतला आहे. ज्या नागरिकांना अद्याप मालमत्ताकराचा भरणा केला नाही, अशांसाठी सवलतींचे दोनच दिवस बाकी आहेत. त्यासोबत सुट्टीच्या दिवशीसुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी कॅश काउंटर सुरू आहेत.
- नीलेश देशमुख, साहाय्यक आयुक्त
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.