संग्रहित छायाचित्र
दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांकडून खाजगी वाहन चालक तिकिटे वाढवून लूट करतात. त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी असलेला आरटीओ विभाग कूचकामी ठरत आहे. कारण, गेल्या पंधरा दिवसापासून आरटीओ कडून तपासणी सुरू होती. मात्र, प्रवाशांकडून भाडेवाढीबाबत ३१ तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे सांगून, त्या अनुषंगाने कारवाई केली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये २० हून अधिक ठिकाणी ट्रॅव्हल्स थांबतात. त्यामुळे ही कारवाई केवळ कागदपत्रे असल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रोजीरोटी, रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भासह कोकणातील मंडळी अधिक आहेत. दिवाळीसाठी अनेक जण कुटुंबासह गावी जातात. सुरक्षित, सवलतीत आणि अल्पदरात प्रवासाची सुविधा असलेल्या रेल्वे आणि एसटी बसच्या प्रवासास त्यांची पहिली पसंती असते. मात्र, तीन महिन्यांपुर्वीच रेल्वेची आरक्षण तिकिटे संपल्याने तसेच एसटीचे देखील आरक्षण फुल्ल झाल्याने यंदा प्रवाशांना खासगी बस ट्रॅव्हल्सकडे मोर्चा वळवावा लागला. त्यांच्या असहायतेचा फायदा घेत 31 जणांनी जादा भाडे आकारल्याचे समोर आले हाेते.
वाहतूकीच्या नियमानुसार, सणासुदीच्या हंगामात एसटी तिकीटाच्या दीडपट किंवा पन्नास टक्के भाडेवाढ करण्याची सवलत खासगी वाहतूकदारांना आरटीओने दिली आहे. परंतु काही ट्रॅव्हल्सधारक या नियमांची पायमल्ली करून, प्रवाशांकडून तिप्पटीने भाडे वसुल केले. याची माहिती आरटीओला मिळताच आरटीओच्या वायुवेग पथकाने दोषी ट्रॅव्हल्सधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांनी निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, दापोडी, पिंपळेसौदागर, सांगवी आदी भागात थांबा घेणा-या ट्रॅव्हल्सधारकांवर कारवाई केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.