संग्रहित छायाचित्र
दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. महापालिकेने मुख्य बाजारपेठांबरोबरच शहरातील प्रत्येक भागातील कचरा उचलला आहे. त्यामध्ये दिवाळीचे चारही दिवस सरासरी १४०० टन कचरा महापालिकेकडून उचलण्यात आला. दाेनशे टनांनी कच-यात भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घटांगाडीमार्फत संकलित केला जातो. मोशीतील कचरा डेपो येथे हा कचरा टाकला जातो. दिवसाला १२०० टन कचरा संकलित केला जातो. मात्र, दिवाळीत मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला. दिवाळीसाठी मागविलेल्या विविध वस्तूचे बाॅक्स, पुट्टे, फटाक्याचा कचरा वाढला आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रेते पूजेचे साहित्य wव विविध साहित्याचे स्टॉल लावत असतात. दिवाळीचा पाडवा संपल्यानंतर स्टॉल हटविण्यात येतात. त्यानंतर संपूर्ण कचरा रस्त्यावरच पडतो. फुले, पूजा-साहित्याचा कचरा यामध्ये सर्वाधिक असतो. यंदा दिवाळीच्या सुरूवातीपासूनच कचरा वाढत गेला. यामध्ये वसुबारसेच्या दिवशी १५६३, ३१ ऑक्टोबरला १३९७, लक्ष्मीपूजनादिवशी १३८२ तर पाडव्यादिवशी १३६८ टन कचऱ्याचे संकलन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले. दिवाळीच्या अगोदर तिन्ही दिवशी शहरातील कचऱ्याने उच्चांकी आकडा गाठला होता.
याशिवाय नियमितचा कचरा उचलण्यात आला. नियमितच्या कचरा संकलनात यंदाच्या दिवाळीत दोनशे टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. दिवाळीच्या प्रमुख तीन दिवसांत शहरात सरासरी १४०० टन एवढा कचरा जमा झाल्याचा अंदाज महापालिकेकडून वर्तविण्यात आला आहे. इतर दिवशी हा कचरा १२०० टन एवढा असतो.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.