संग्रहित छायाचित्र
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: महापालिकेने बाह्ययंत्रणेमार्फत वाहनचालक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडून (मेस्को) ६० वाहनचालक दोन वर्षे मानधनावर घेण्यात आले. त्यासाठी ८ कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र, वाहनचालक पदासाठी माजी सैनिकांना थेट पध्दतीने घेताना त्यांच्या १३ पाल्यांना भरती प्रक्रियेत सामावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे शहरातील तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे माजी सैनिकांच्या नावावर त्यांच्याच मुलांना थेटपणे नोकरी देण्यात आली आहे. (PCMC)
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेतील विविध विभागातील कामकाजास, अधिकार्यांना वाहनचालक नसल्याने अनेक कामांना विलंब लागत होता. दैनंदिन कामाचादेखील खोळंबा होत होता. कामकाज सुरळीत होण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडून (मेस्को) ६० वाहनचालक दोन वर्षांसाठी मानधनावर घेतले आहेत. तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयातदेखील अतिक्रमण विभागात वाहनचालक उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामांचा खोळंबा होऊ लागला होता. सर्व विभागांची मागणी विचारात घेऊन पालिकेच्या यांत्रिक विभागाने मेस्को ६० वाहनचालक मानधनावर घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या वाहनचालकांना महिन्यातील २६ दिवसांचे वेतन, महागाई भत्ता फरक, आपत्कालीन भत्ता देण्यात येणार आहे. वाहनचालकास दर महिन्यास ३४ हजार ४४६ रुपये मानधन दिले जात आहे. मेस्कोकडून ६० वाहनचालक नेमण्यास तसेच, त्यांच्यावरील २ वर्षांच्या वेतनाच्या एकूण ८ कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान, बाह्य यंत्रणेकडून दोन वर्षांसाठी मानधन तत्त्वावर वाहनचालक घेण्यासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडून ६० माजी सैनिकांना घेण्यात येणार होते. त्यापैकी ४५ वाहनचालक आणि एक सुपरवायझर असे ४६ माजी सैनिक कामावर हजर झाले आहेत. अजून १४ माजी सैनिक कामावर हजर झालेले नाहीत. मात्र, ४६ मधील १३ जण माजी सैनिकांची मुले असल्याची बाब उघडकीस आली आहे.
स्थानिक बेरोजगार युवकांवर अन्याय
शहरातील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे. त्यांची हक्काची नोकरी हिरावली गेली आहे. पालिकेचे विविध विभाग, इमारती, शाळा, गोदाम व कार्यालयाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक, वाहनचालक कंत्राटी पद्धतीने भरले जातात. अतिक्रमण धडक पथकात एसएएफचे जवान नेमले आहेत. प्रशासनाने स्थानिक युवकांना डावलण्याचा प्रकार सुरू केला आहे. मेस्कोकडून थेट भरती केली आहे. सेवानिवृत्त सैनिकांना त्यांची सेवा संपल्याने ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांना निवृत्तिवेतनासह इतर सेवा व सुविधा मिळतात. तरीही नोकरीसाठी त्यांना प्राधान्य देणे योग्य नाही. यामुळे स्थानिक सुशिक्षित युवकांच्या नोकरीवर गदा येत आहे. नोकरी हिरावली गेल्याने बेरोजगारी वाढण्याचा धोका आहे. मेस्कोकडून थेट कंत्राटी नोकरी भरती न करता, स्थानिक युवक व युवतींना नोकरीत प्राधान्य द्यावे अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे यांनी केली अाहे.
मेस्को संस्थेकडून थेट पध्दतीने दोन वर्षांसाठी ६० वाहनचालक घेण्यात येत असून त्यातील ४६ लोक नियुक्त केलेत. उर्वरित आणखी १४ माजी सैनिकांना कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्या माजी सैनिकांच्या मुलांना देखील आपण कामावर घेण्याचा आदेश असल्याने त्यांना वाहनचालक म्हणून नोकरीवर घेत आहे.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.