संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी संपलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयातील प्रत्येक विभागामध्ये शुकशुकाट होता. इतर वेळी नागरिकांच्या गर्दीने गजबजलेला बांधकाम परवानगी विभाग आणि अभियांत्रिकी विभागात खुर्च्या रिकाम्या होत्या. प्रत्येक विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यापासून ते संगणक चालकापर्यंत सुटीवर आहेत. परिणामी, विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना खाली हात परतावे लागत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून दिवाळीच्या निमित्ताने कामे होत नव्हती. त्यामुळे केवळ विशेष भेट देण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिक यांची ये-जा सुरू होती.
दरम्यान, चार दिवस दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून प्राधिकरण कार्यालय नियमित सुरू झाले. मात्र अद्याप राज्य शासनाचे प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि जुने प्राधिकरणातील अधिकारी अद्याप रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या हाताखाली असलेले इतर कनिष्ठ अभियंतापासून ते संगणक चालक देखील उपस्थित नाहीत. परिणामी, विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांची भेट होत नसल्याने ते खाली हात परतत आहेत.
त्यातच चौथ्या मजल्यावर असलेला विकास परवानगी अर्थात बांधकाम परवानगी विभागातील अधिकारीदेखील सुट्टीवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची देखील संख्या कमी झाली आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन विभाग, जमीन व मालमत्ता विभाग आणि त्यानंतर विविध छोटी मोठी कामे सुरू असलेला अभियांत्रिकी विभाग सर्व उपविभागातील अधिकारी सुट्टीवर आहेत. प्राधिकरणात एकदम शुकशुकाट जाणवू लागला आहे . सोमवारनंतर मंगळवारी नियमितपणे सर्वजण कामावर रुजू होणे अपेक्षित होते. मात्र, तरी देखील कोणी अधिकारी सुट्टीवर पुन्हा न आल्याने विभागामध्ये कोणीच नसल्याचे दिसून आले.
नव्या कंपनीकडून ढिलाई ?
पीएमआरडीएच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी नेमणूकसाठी नवी कंपनी दोनच महिन्यांपूर्वी नेमली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी मिळाली नसल्याने अनेकांनी दिवाळीनंतर कामावर येण्याचे टाळले. परिणामी, दिवाळी झाल्यानंतर होणारी कामे पुन्हा लाबणीवर पडलेली आहेत. त्यामुळे नव्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांवर असलेली एक प्रकारची ढिलाई दिसून आली. तसेच, या ठिकाणी नेमणूक असलेले राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी पुण्याच्या बाहेरील असल्याने तेदेखील अद्यापपर्यंत सुट्टी वरती पुन्हा आले नाहीत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.