संग्रहित छायाचित्र
शहरातील पिंपरीपासून ते निगडीपर्यंत मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम पालखी सोहळ्यामुळे बंद होते. दरम्यान, जगदगुरू श्री संत तुकोबाराय पालखी सोहळा शहरातून पुढे पंढरपूरकडे रवाना होताच बंद कामाला सोमवारी (१ जुलै) पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी काम बंद ठेवण्यात आले होते. रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवण्याचे पत्रही पिंपरी-चिंचवड महापालिकेने मेट्रो प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा कामे सुरू झाली आहेत.
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर रोजी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते. त्यानुसार या कामाला आता सुरुवात झाली होती. भक्ती-शक्ती चौक आणि पवळे ब्रीज येथे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. सुरुवातीला माती परीक्षणाचे कामकाज सुरू होते.
२७ जूनपासून आषाढी वारीनिमित्त देहूवरून संत तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांची संख्या पाहता या दरम्यान असलेल्या रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले होते. पालखी सोहळ्याला या कामाचा अडथळा येऊ शकतो, अशी शक्यता देखील प्रशासनाने व्यक्त केली होती. पोलिसांनी या मार्गाची पाहणी करून वाहतुकीत बदल करण्यात आला होता. निगडीकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोने बॅरिकेड्स उभे केले होते. त्यामुळे पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण झाला असता.
दरम्यान, पालखी सोहळ्याला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मेट्रो प्रशासनाला पत्र देऊन पालखी सोहळा दरम्यान काम थांबवण्याची सूचना केली होती.त्यानुसार मेट्रोने बॅरिकेड्स काढून कामे स्थगित केली होती. सध्या पालखी सोहळा शहरातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर १ जुलैपासून मेट्रोने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान मेट्रोची कामे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणची पाहणी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार १ जुलैपासून कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.
- हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.